Nitin Gadkari Property : मोदी सरकारमध्ये (Modi Government) मागील 10 वर्षात नेहमी कोट्यावधींच्या पॅकेजची घोषणा करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरींची (Nitin Gadkari) चर्चा राहिली आहे. मात्र, स्वतः गडकरी यांची संपत्ती (Property) किती असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. दरम्यान, बुधवारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून (Nagpur Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज भरतांना निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरी यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला आहे. ज्यात मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


नितीन गडकरी यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार गडकरी, त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे मिळून एकूण 15.52 कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, एकूण कर्जाची रक्कमदेखील वाढली आहे. 2019 साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे मिळून 10 कोटी 27 लाख 34 हजार 854 रुपयांची संपत्ती होती. तर 2024 मध्ये हा आकडा 15 कोटी 52 लाख 60 हजार 46 इतका झाला. 


गडकरींच्या संपत्तीचा तपशील...


शपथपत्रातील माहितीनुसार गडकरी व त्यांच्या पत्नीकडे 2019 साली 1 कोटी 61 लाख 37 हजार 851 रुपयांची चल संपत्ती होती. 2024 मध्ये हा आकडा 2 कोटी 57 लाख 77 हजार 46 इतका झाला आहे. यात 27 हजार 50 रुपयांची रोकड, 65 लाख 10 हजार 300 रुपयांचे ‘बँक डिपॉझिट्स’, 38 लाख 50 हजार 396 हजार रुपयांची गुंतवणूक,  45 लाख 94 हजार 843 रुपयांची वाहने तर 56 लाख 1 हजार 757 रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. 


गडकरी यांच्या नावे 1 कोटी 32 लाख 90 हजारांची चल संपत्ती


2019 ते 2024 या कालावधीत गडकरी व त्यांच्या पत्नीच्या नावे कुठलीही नवीन अचल संपत्तीची खरेदी झालेली नाही. 2019 साली त्यांच्याकडे 8 कोटी 65 लाख 97 हजार रुपये मूल्याची अचल संपत्ती होती. आता त्याचे मूल्यांकन 12 कोटी 94 लाख 83 हजार इतके आहे. अचल संपत्तीमध्ये 1 कोटी 57 लाख 41 हजारांची धापेवाडा येथे 15 एकर शेतजमीन, वरळी येथील 4 कोटी 95 लाख चालू बाजारमूल्य असलेला फ्लॅट, धापेवाडा येथील 1 कोटी 28 लाख 32 हजारांचे वडिलोपार्जित घर, उपाध्ये मार्ग येथील 5 कोटी 14 लाखांचे घर यांचा समावेश आहे. केवळ नितीन गडकरी यांच्या नावे 1 कोटी 32 लाख 90 हजारांची चल संपत्ती व 4 कोटी 95 लाखांची अचल संपत्ती आहे.


पाच वर्षांत सात मानद पदव्या


दरम्यान, गडकरी यांना 2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत सात मानद पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात चार डी.लिट, एक पीएचडी व दोन डीएस्सी पदव्यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यासाठी या पदव्या त्यांना देण्यात आल्या. गडकरी यांचे शिक्षण बीकॉम व एलएलबी झाले आहे.


दहा न्यायालयीन प्रकरणे


नितीन गडकरी यांनी बुधवारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याआधी गडकरी यांच्याकडून नागपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरी यांनी आपल्यावर दाखल गुन्ह्याची आणि न्यायालयीन प्रकरणाची देखील माहिती दिली आहे. ज्यात गडकरी यांच्याविरोधात विविध प्रकारचे दहा न्यायालयीन खटले सुरू आहेत.


संबंधित बातम्या : 


Vikas Thakre Net Worth : नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या विकास ठाकरेंची संपत्ती किती?; पाच वर्षात तब्बल एवढी वाढ!