सोलापूर : माळशिरसच्या नवनिर्वाचित आमदाराने ऊसतोड मजुराचा मुलगा ते थेट विधानसभेत आमदार असा थक्क करणारा प्रवास केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांनी माळशिरस मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

आमदार होण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी हवी, बक्कळ पैसा हवा, हे जरी वास्तव असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी हा समज खोटा ठरवला आहे. फडणवीस आणि मोहिते पाटील यांनी एका सामन्य घरातील तरुणाला विधानसभेवर आमदार म्हणून पाठवले आहे.

माळशिरस हा राखीव मतदारसंघ असला तरी हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राज्यातली अनेक बडे नेते येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी राम सातपुते या इंजिनियर तरुणाला येथून उमेदवार म्हणून मोहिते पाटील यांच्या ताब्यात दिले. मोहिते पाटलांनी त्या इंजिनियर तरुणाला आमदार बनवले आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सातपुते कुटुंब हे ऊस तोडणीसाठी माळशिरस परिसरात अनेक वर्षांपासून येत आहे. तेवढीच काय ती त्यांची माळशिरसची ओळख. आजही सातपुते कुटुंब अतिशय गरिबीच्या स्थितीत आष्टी तालुक्यात छोट्याशा घरात राहतं. त्याच कुटुंबातील हा मुलगा पुण्यातून इंजिनियर झाला. याचकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात सक्रिय झालेला राम पुढे पूर्णवेळ भाजप आणि संघाचे काम करू लागला. यातूनच भाजपने हा उमदा तरुण हेरला आणि त्याला थेट माळशिरसमधून विधानसभेच्या रिंगणात उतरवले.

रामसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माळशिरसमध्ये सभा घेतली तर प्रचाराची जबाबदारी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उचलत या तरुणाला आमदार केले. राम यांच्या आई वडिलांना आमदार म्हणजे काय हे माहीत नसले तरी आपला मुलगा काहीतरी चांगले करतोय हे त्यांना नक्की माहिती आहे, असे राम यांनी सांगितले. तसेच राम यांच्या होणाऱ्या पत्नीदेखील त्यांच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, माझ्या आईला विधानसभा दाखवायची आहे, अशी इच्छा असल्याचे राम यांनी सांगितले, तर आपल्याला फक्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडावे, अशी त्यांच्या आईची मागणी आहे.

पाहा राम सातपुते यांचा थक्क करणारा प्रवास