राऊत जी, सविनय जय महाराष्ट्र!
तुमच्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवरचं सोबत दिलेलं रेखाचित्र पाहिलं. रेखाचित्रातील मेसेज स्पष्ट आहे. त्यावर मला काही म्हणायचं नाही. माझा आक्षेप आहे तो त्यात दाखवलेल्या मराठी माणसाच्या रेखाटनाला. राऊत जी, मी बाळासाहेबांची जुनी व्यंगचित्र पाहिली आहेत. तुम्ही शेअर केलेल्या चित्रातील मराठी माणूस बाळासाहेब रेखाटित तसाच दिसतो. कदाचित, त्यांच्याच एखाद्या व्यंग चित्रातील पात्र या चित्रासाठी घेतलं गेलं असेल.
मुद्दा आहे तो आजचा मराठी माणूस असा आहे का? तो असा दिसतो का? तो असा कधीतरी दिसत होता का? बाळासाहेब दाखवित तो मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या व नंतर शिवसेनेच्या उभारीच्या काळात बाळासाहेबांना दिसला-वाटला-कल्पिला तसा त्यांनी तो काढला. गंमत म्हणजे दादरला शिवाजी पार्काच्या पुढे, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाशेजारी असलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मारकाच्या इमारतीच्या प्रांगणातील शिल्पातही असा मराठी माणूस दिसत नाही. माझा अंदाज आहे की, बाळासाहेबांसमोर तेव्हा शिवसेनेचा काडर असलेला कोकणी मराठी माणूस दिसला असेल. अर्थात, हा अंदाज चुकीचा असू शकतो. दुसरी शक्यता आहे की, नागावला गेलेला मराठी माणूस त्यांना दाखवायचा असेल. मात्र, तरीही थोडं पोट सुटलेला, हाफ चड्डीतला मराठी माणूस किमान मला तरी कधीच भावला नाही. तो इतका वेंधळा कधीच नव्हता ना दिसला....
असो...तो काळ गेला. आज स्थिती काय आहे? राऊत जी, 'स्टार माझा' म्हणजे आताची 'एबीपी माझा' ही वृत्तवाहिनी 2007 साली सुरू झाली, तेव्हा आमचं ब्रीद होतं- 'नव्या मराठी माणसाचे, नवे न्यूज चॅनल'. आज मराठी माणूस कसा दिसतो? राऊतजी, आज अगदी गाव-खेड्यातले आपले बांधवही गांधी टोपी, लेंगा, सदरा, शर्ट-पँट, क्वचित धोतरात दिसतात. हे मी किमान जुन्या पिढीबद्दल बोलतोय. ग्रामीण तरुणाई शहरी तरुणाईइतकीच अग्रेसर आहे. माझ्या ऑफिसमध्ये बहुतांश हाऊसकिंपीग स्टाफ कोकणी मराठी आहे. त्यातील तरुण मुलं ऑफिसला येताना उत्तम जीन्स-टी शर्ट आणि लेटेस्ट हेअरस्टाईल करून येतात. अशीच तरुणाई मला दादरला शिवसेनेची हंडी फोडायला आलेली दिसते. हे झालं मध्यम व निम्न मध्यमवर्गीय तरुणाईचं. आदित्य ठाकरेंचं काय वर्णावं? He's cool young man of our times....मग, राऊत जी....तुम्हाला हा हाफचड्डीतला मराठी माणूस दिसला कुठे?
दिसण्याचंही सोडून द्या. शिवसेना मराठी माणसाचं प्रतिनिधीत्व करते. आज तिच्याकडे सत्तेच्या चाव्या आहेत. विधानभवनावर मराठी माणूस रुपी शिवसेना भगवा फडकवायला जात आहे. मग, असा मराठी माणूस किमान या शुभ-आनंदी-यशस्वी प्रसंगी कसा दिसला पाहिजे? चड्डीतला की जीन्स मधला? केस पिंजारलेला-चिडलेला की उत्तम फेटा घातलेला आणि चेहऱ्यावर विजयी हास्य असलेला?
शेतकऱ्यांचा 'खरा' जाणता राजा शरद जोशी यांनी टी-शर्ट-जीन्समध्ये शेतकऱ्यांना संबोधित केल्याचा फोटो मी पाहिलाय. राज ठाकरे तर टी-शर्ट-जीन्समधील शेतकरी बघण्याचं स्वप्न पाहतात. आदित्य-रोहित पवाररुपी राजकीय जीन्स-क्रांती आज महाराष्ट्रात होतेय...
मग, राऊत साहेब... तुमचा मराठी माणूस चड्डीतच राहणार का?
ता.क. 1 - 'चड्डीत राहा' हा मराठीतील एक स्लँग वाकप्रचार आहे. ज्याचा अर्थ लायकीत, मर्यादेत राहणे असा आहे. त्याही अर्थानं तुम्ही दाखवत असलेला मराठी माणूस लायकीतच राहावा, मोठ्य़ा महत्वाकांक्षा त्यानं पाहू नयेत, असं आपल्याला खचितच वाटत नसावं, ही आशा.
ता.क. 2 - मराठी माणूस म्हटला की (यात पुरुषांची उदा. दिली आहेत, कारण तुमच्या चित्रात फक्त पुरूष आहे.) मला आठवतं ते फ्लोरा फाऊंटनपाशीचं शेतकरी व कामगाराचं शिल्प. मला आठवतं संयुक्त महाराष्ट्र दालनाच्या प्रांगणातील शिल्प, छत्रपती शिवराय-संभाजी, बंद गळ्याचा कोट घातलेले यशवंतराव चव्हाण, सदैव पांढरा शर्ट आणि पँट घालणारे शरद पवार, कुर्ता घालणारे पु.लं, उत्तम थ्री पीस सूटमधील घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, देखण्या फेट्यातील शाहू महाराज, टेबलापाशी बसलेले कोट व धोतरातील ज्योतिराव फुले, लक्ष वेधून घेणारा बो लावणारे शंतनुराव किर्लोस्कर, सिपोरेक्सवाले शिर्के..... बाकी मराठी तारे-तारका, साहित्यिक, गायक, लेखक, समाजसेवक (अगदी बाबा आमटेही फक्त विदर्भाच्या कडक वातावरणात अल्पवस्त्रित असायचे) यांची तर मोजदादही नाही......दादा कोंडकेंचं उदाहरण कुणी देईलही, पण त्यांच्या 'एकटा जीव' या आत्मचरित्रात्मक ग्रंथावरील त्यांचा फेट्यातील फोटो पाहा....काय देखणे होते दादा कोंडके!
राऊत जी.....
अहो, अशोक सराफही शर्टाचं पहिलं बटण उघडं ठेवत असले तरी बरे दिसायचे......हाफ चड्डीतला मराठी माणूस नको हो!