नरेंद्र मोदींच्या नमो अॅपशी संबधित कंपनीच्या 15 फेसबुक पेजेसवर कारवाई
एबीपी माझा वेब टीम | 01 Apr 2019 08:38 PM (IST)
लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना फेसबुकने काँग्रेस आणि भाजपला जोरदार झटका दिला आहे. समाजमाध्यमांवर खोट्या बातम्या आणि माहितीचा प्रसार करणाऱ्यांवर फेसबुककडून कारवाई सुरु करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना फेसबुकने काँग्रेस आणि भाजपला जोरदार झटका दिला आहे. समाजमाध्यमांवर खोट्या बातम्या आणि माहितीचा प्रसार करणाऱ्यांवर फेसबुककडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. फेसबुकने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी संबधित असलेल्या एका आयटी कंपनीची काही फेसबुक पेजेस आणि अकाऊंट्सवर कारवाई केली आहे. फेसबुकने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. नमो अॅपशी संबधित फेसबुक पेजेसवर कारवाई करण्यापूर्वी फेसबुकने काँग्रेसशी संबंधित काही व्यक्तींच्या तब्बल 687 फेसबुक खात्यांवर कारवाईक केली आहे. त्यामध्ये 549 फेसबुक अकाऊंट्स आणि 138 फेसबुक पेजेसचा समावेश आहे. या पेजेसवरुन खोटी माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. त्यामुळे ही पेजेस बंद केल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकच्या या कारवाईमुळे ऐन निवडणूक काळात काँग्रेस आणि भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सिल्ह्वर टच ही आयटी कंपनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपशी संबधित आहे. या कंपनीने बनवलेली 15 पेजेस फेसबुकने बॅन केली आहेत.