Exit Polls 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज येण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये आप पक्षाला सत्ता मिळू शकते. तर गोव्यात त्रिशंकु स्थिती निर्माण झाली आहे. एबीपी माझा आणि सी वोटर यांनी एक्झिट पोल तयार केला आहे. त्यानुसार हा अंदाज बांधला जात आहे. पण दहा मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यावेळी कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.


उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज?
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांची सत्ता येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी मतदान पार पडले. सत्ता स्थापन करण्यासाठी 202 जागांची गरज असते. एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला दोन आकडी संख्याही गाठणे अवघड ठरणार आहे असं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येतंय.


काय सांगतोय एक्झिट पोल?



भाजप- 228-244
सपा- 132- 148
बसपा- 13-21
काँग्रेस- 4-8


2017 साली भाजपला बहुमत 
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 317 जागा, समाजवादी पक्षाला 47 जागा, बसपाला 19 जागा तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या.


गोव्यात त्रिशंकु स्थिती?
Exit poll नुसार गोव्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. पण या अटीतटीच्या लढतीत भाजपकडे सत्ता स्थापन करण्याची मोठी संधी असणार आहे. भाजपसमोर गोव्यात  कॉंग्रेस, आम आदमी पक्षाचे आव्हान आहे. टीएमसी गोव्यात पहिल्यांदा लढत आहे. 40 जागा असणाऱ्या  गोव्यात 2017 साली भाजपच्या खात्यात 13 जागा आल्या होत्या. या वर्षी गोव्यात भाजपला 13 ते 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे.  तर कॉंग्रेसला 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  तर आपला 1 ते 5, मगोपला 5 ते 9 आणि इतरांना 0 ते दोन जागा मिळण्याची शक्याता आहे. गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 21 जागांची गरज आहे.


उत्तराखंडमध्ये अटीतटीची लढत?
उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. यंदा 65.37 टक्के मतदान पार पडलं. ज्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळली आहे. ज्यात भाजप 40.8 टक्के मतांनी सरस ठरल्याचं दिसत असून काँग्रेस 39.3 टक्के मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आपला 8.7 टक्के आणि 11 टक्के जागा इतरांच्या पदरात पडल्या आहेत. एकूण जागांचा विचार करता भाजपकडे 26 ते 32, तर काँग्रेसकडे 32 ते 38 जागा आहेत. आम आदमी पार्टीचा विचार करता त्यांना 0 ते 2 आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळाल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. बहुमतासाठी 36 जागांची गरज असल्याने काँग्रेस कुठेतरी काठावर पास होत असल्याचं या एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे.


पंजाबचा कौल आप पक्षाला
एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार येऊ शकते. पंजाबमध्ये आपला 39.1 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर आप पक्षाला 51 ते 61 टक्के मते मिळू शकतात.  एबीपी माझा आणि सी वोटर यांच्याकडून सर्व्हे घेण्यात आला आहे. त्यानुसार, पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आप पक्षाचे सरकार येण्याची शक्यता आहे. पण पंजाबमध्ये कुणाची सत्ता येणार हे 10 मार्च रोजी समजणार आहे. पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 58 जागांची गरज आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला 22 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला दोन आकडी संख्याही गाठणे कठीण असल्याचे दिसतेय.  


मणिपूरमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार?
एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार, 2022 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत येण्याची शक्यता आहे. 60 जागांसाठी  मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार मणिपूरमध्ये भाजप युतीला 23 ते 27 जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाला 12 ते 16 जागा मिळू शकतात, तर एनपीएफला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल. एनपीपीला 10 ते 14 जागा मिळतील. तर 2 ते 6 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.