पिवळी साडी नेसलेल्या आणि हातात इव्हीएम मशीन असलेल्या एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला निवडणूक अधिकारी गाझियाबाद मधील आहे असं कोणी सांगतंय तर कोणी हरियाणा मधील आहे, असा दावा करतंय. मात्र 'एबीपी न्यूज'ने या व्हायरल फोटोतील महिलेचा शोध घेतला आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे.

व्हायरल झालेल्या या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे रिना द्विवेदी. त्या लखनऊ येथील रहिवासी असून तेथील निर्माण भवनमध्ये त्या काम करतात. लखनऊ येथे त्या आपल्या कुटुंबासोबत राहतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोबाबत रिना यांना विचारलं असता 'मी फक्त माझी ड्यटी करत होते', असं त्यांनी सांगितलं. "पारंपारिक भारतीय वेशभुषेत मी निवडणुकीच्या ड्युटीवर गेले होते. मी नेहमी अशाच पेहरावात असते", असंही रिना यांनी सांगितल.


मोहनलालगंज येथील एका मतदान केंद्रावर रिना यांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेली होती. त्यावेळी हातात ईव्हीएम मशीन घेऊन जात असतानाच्या त्यांच्या फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. तसेच या महिला अधिकारी ड्युटीवर असलेल्या मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाल्याचा मेसेज देखील या फोटोसोबत व्हायरल करण्यात येत आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे रिना यांनी सांगितले. त्या ड्युटीवर असलेल्या मतदान केंद्रावर 70 टक्के मतदान झाल्याची माहिती त्यांनी दिली.

व्हायरल फोटोबाबत बोलताना रिना म्हणाल्या की, "त्या दिवशी मी माझ्या कामात व्यस्त होते. लोकांनी फोटो क्लिक केले ते व्हायरल झाले. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र त्याकडे मी फार लक्ष देत नाही. मी आणि माझे कुटुंब या सगळ्या गोष्टींना सकारत्मक नजरेने पाहते".

यापुर्वी 2017 मध्ये देखील निवडणूक कामात असतानाचा रिना यांचा फोटो व्हायरल झाला होता.