बीड : बीडमध्ये वाळूचोरी करणाऱ्या आरोपींना चक्क श्रमदान करण्याची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या गावकऱ्यांबरोबर आता वाळूचोरी करणारे गुन्हेगारही नेटाने श्रमदान करताना पाहायला मिळत आहेत.


बीडमध्ये भर उन्हात हातात कुदळ-फावडं घेऊन गेवराईचे सहा युवक बांधबंधिस्ताचं काम करत आहेत. या युवकांनी स्वतःला स्वेच्छेने श्रमदानात झोकून दिलेलं नाही, तर बीड सत्र न्यायालयाच्या एका आदेशाने त्यांच्यावर श्रमदानाची वेळ आली आहे. वाळू चोरी करणाऱ्या आरोपींना न्यायालयाकडून कडक शिक्षा करताना आपण पाहिलं आहे, मात्र बीडच्या कोर्टाची ही शिक्षा अनोखी म्हणता येईल.

काय आहे प्रकरण?

4 ऑगस्ट 2017 रोजी अवैध वाळू उत्खनन  होत असल्याची बाब गेवराईचे मंडळ अधिकारी सुनील तांबारे यांच्या लक्षात आली. त्यानंतर आरोपी तरुणांचा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तांबारे यांनी कारवाई केली. मात्र कारवाईचा राग अनावर झाल्याने सहा जणांनी तांबारेंना गंभीर मारहाण केली.

सुनील तांबारे यांनी गेवराई पोलिसात तक्रार दिली आणि या तरुणांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागला. न्यायालयाने सर्व बाबी तपासून या सहा आरोपींना दोन महिने श्रमदान करण्याची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपींना 'वॉटर कप'मध्ये सहभागी होऊन काम संपेपर्यंत श्रमदान करण्याची अनोखी आणि ऐतिहासिक शिक्षा ठोठावली असल्याने न्यायालयाच्या या अभूतपूर्व निर्णयाचे स्वागत होत आहे.

विशेष म्हणजे हे सहाही आरोपी शिक्षित आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार करुन न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. शिक्षा मिळाल्यानंतर हे सहाही आरोपी मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत.

सध्या पेंडगावमध्ये त्यांचं श्रमदान सुरु असून आरोपींनीही न्यायालयाच्या या अभूतपूर्व निर्णयाचं स्वागत केलं आहे. एवढंच नाही, तर असा गुन्हा कोणीही न करण्याचं आवाहन ते इतरांना करत आहेत.

गुन्हा हा गुन्हाच असतो. मात्र गुन्हेगारीची वाट बाजूला करत बीड जिल्हा सत्र न्यायालयाने या सहाही आरोपींना श्रमदानाची शिक्षा ठोठावून सामाजिक भान जपल्याने न्यायालयाच्या या निकालाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.