नवी दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार या बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असून महाराष्ट्रासह हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची चिन्हं आहेत. यंदा महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत.


सध्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण करणं निवडणूक आयोगासाठी बंधनकारक आहे.

राजकीय पक्ष, इच्छुकांमध्ये धाकधूक
2014 मध्ये गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. 15 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं होतं आणि 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. यानंतर 31 ऑक्टोबर रोजी सरकारचा शपथविधी झाला होता. परंतु यंदा सप्टेंबर महिन्याची 20 तारीख उलटून गेल्यानंतरही निवडणूक जाहीर न झाल्याने राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.

मतदान दिवाळीपूर्वी की दिवाळीनंतर
2014 ची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडली होती. परंतु यंदा महाराष्ट्रातील निवडणूक दोन टप्प्यात पार पडू शकते, असा अंदाज आहे. पण सगळ्यांना उत्सुकता आहे ती निवडणुकीची तारीख दिवाळीपूर्वी असेल की दिवाळीनंतर? काही दिवसांपूर्वी दिवाळीनंतर मतदान होईल अशी चर्चा होती. त्यामुळे या चर्चांनाही आजच्या पत्रकार परिषदेत पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

2014 मधील पक्षीय बलाबल
भाजप - 122 जागा
शिवसेना - 63 जागा
काँग्रेस - 42 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस - 41 जागा
इतर - 20 जागा
एकूण - 288 जागा

संबंधित बातम्या