मुंबई : भारत सरकारने बहाल केलेला 'पद्मश्री' परत करण्याचा विचार मनात आला होता, अशी कबुली प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानने दिली आहे. 'पद्मश्री' विकत घेतल्याचा आरोप झाल्यानंतर वैफल्याची भावना आल्याचं सैफ म्हणाला. अभिनेता अरबाज खानच्या 'पिंच' या चॅट शोमध्ये सैफने मन मोकळं केलं.


'पद्मश्री' या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने अभिनेता सैफ अली खान याला 2010 साली गौरवण्यात आलं होतं.

सैफ अली खानने पैशांच्या मोबदल्यात 'पद्मश्री' मिळवल्याचा आरोप सोशल मीडियावर काही जणांनी केला. 'या ठगाने पद्मश्री विकत घेतला. मुलाचं नाव तैमूर ठेवलं. काही जणांना रेस्टॉरंटमध्ये मारहाण केली. याला सॅक्रेड गेम्समध्ये भूमिका कशी मिळू शकते. त्याला धड अभिनयही जमत नाही.' अशा आशयाचं ट्वीट सैफबाबत करण्यात आलं होतं.

'मी ठग नाही... मी पद्मश्री विकत घेतला नाही, आणि ते शक्यही नाही. भारत सरकारला लाच देणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. तुम्हाला वरिष्ठांना भेटावं लागतं. मला तो स्वीकारायचा नव्हता. चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज अभिनेते आहेत, ज्यांची पात्रता असूनही त्यांना पद्म पुरस्कार मिळालेलं नाही. माझ्यासाठी ते खूपच लाजिरवाणं होतं. अर्थात, असेही काही जण आहेत, ज्यांना पद्म पुरस्कार मिळालेला आहे, मात्र ते माझ्यापेक्षा कमी लायकीचे आहेत' असं सैफ म्हणाला.

VIDEO | सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत रिलेशनशीपबद्दल सारा म्हणते...



माझे वडील मन्सूर अली खान पतौडी यांनी त्यावेळी माझं मन वळवलं, असं सैफने सांगितलं. 'मला हा सन्मान परत करायचा होता. मला तो स्वीकारायचाच नव्हता. मला बाबा म्हणाले की तू भारत सरकारला नाकारण्याइतका मोठा झालेला नाही' असंही सैफ म्हणाला.

काही वर्षांपूर्वीही सैफचा सन्मान परत घेण्यावरुन वाद उफाळला तेव्हा, त्याची पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूरने 'सैफने पद्मश्री मागितला नव्हता,' असं तोऱ्यात उत्तर दिलं होतं. सैफने ‘पद्मश्री’साठी कधीच तगादा लावला नव्हता, त्यामुळे केंद्राने पुरस्कार मागे घेतल्यास सैफही आनंदाने परत करेल असं करीना कपूरने सांगितलं होतं.

कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2010 मध्ये सैफला ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात आलं. मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमध्ये सैफ अली खानने मारहाण करुन गोंधळ घातला होता. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला पद्म पुरस्कार कसा काय दिला जाऊ शकतो, असा सवाल उपस्थित करत सुभाष अग्रवाल यांनी आरटीआयअंतर्गत याचिका दाखल केली होती.
संबंधित बातम्या :

सैफ अली खानचा ‘पद्मश्री’ परत घेण्याची शक्यता

सैफ अली खानचा पद्मश्री काढून घेणार ?

ताज हॉटेलमधील मारहाणीप्रकरणी सैफ अली खानविरुद्ध आरोप निश्चित