Election 2022 : पंजाबमध्ये आज सर्वच 117 जागांसाठी मतदान होत आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्येही तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले आहे. विशेषत: तरुणांना आणि प्रथमच मतदान करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीट करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशला कुटुंबवाद, जातिवादापासून मुक्त करण्यासाठी विकासाला गती देणाऱ्या सरकारला निवडून देण्यासाठी तुमचे मत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. तर पंजाबला सुरक्षीत ठेवण्यासाठी राज्याला एकसंध ठेवणारे सरकार निवडा असे देखील शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
पंजाबचा सुवर्ण आणि गौरवशाली इतिहास आहे. ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. मी पंजाबच्या मतदारांना आवाहन करतो की, राज्य सुरक्षित ठेवा आणि सांस्कृतिक वारसा आणि गुरूंची समृद्ध परंपरा पुढे ठेवा. पंजाब आणि देशाला एकसंध ठेवणारे सरकार निवडण्यासाठी आज मतदान करा, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज (20 फेब्रुवारी) पार पडत आहे. तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यांमधील 59 जागांसाठी मतदान होत आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये देखील आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. पंजाबमधील 117 जागांसाठी मतदान सुरू आहे. पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये सकाळी 7 वाजल्यपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सायकांळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये या तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 16 लाख 12 हजार 010 पुरुष मतादर तर 99 लाख 62 हजार 324 महिला मतदारांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर पंजाबमध्ये 117 जागांसाठी 1 हजार 304 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंजाबमध्ये 2.14 कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: