Election 2022 : उत्तर प्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज (20 फेब्रुवारी) पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यांमधील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये देखील आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान होणार आहे. पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून, सायंकाळी  6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


उत्तर प्रदेशमध्ये या तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 16 लाख 12 हजार 010 पुरुष मतादर तर 99 लाख 62 हजार 324 महिला मतदारांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर पंजाबमध्ये 117 जागांसाठी 1 हजार 304 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंजाबमध्ये 2.14 कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 


पंजाबमध्ये यावेळी काँग्रेस, आप, शिरोमणी अकाली दल-बसपा युती, भाजप-पीएलसी-शिरोमणी अकाली दल (युनायटेड) आणि विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेला संयुक्त समाज मोर्चा या पक्षांमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. 
सत्ताधारी काँग्रेसला ड्रग्ज आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी या निवडणुकीत जोरदार निशाणा साधला आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 58 जागांवर 10 फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला 55 जागांवर मतदान पूर्ण झालं आहे. यूपीमध्ये सातव्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. 10 मार्चला निकाल लागणार आहे.


यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 16 जिल्ह्यांतील 59 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. येथून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री प्राध्यापक एसपी सिंह बघेल आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आमने सामने आहेत.