Election 2022 : पाच राज्याच्या निवडणुकांच्या निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमिफायनल भाजपनं जिंकली आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपनं आपला करिष्मा कायम ठेवलाय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज पाहायला मिळले.   गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा दबदबा कायम आहे. तिकडे पंजाबच्या निकालानं पूर्ण राजकारण बदललंय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे.


उत्तरप्रदेश   निवडणूक निकाल 


 सर्वात मोठी लढाई उत्तर प्रदेशची  होती. जी भाजपनं जिंकलेली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजप 265 जागी आघाडीवर तर समाजवादी पक्षाला 133  जागांवर समाधान मानावं लागलंय.  तिकडे  बसपा  तिसऱ्या स्थानी तर  काँग्रेस  चौथ्या स्थानी पोहोचलं आहे. 


गोवा  निवडणूक निकाल 


गोव्यात भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झालंय. गोव्यात बहुमताचा आकडा 21 इतका आहे, सध्या भाजप 19 जागांवर आघाडीवर असून बहुमतासाठी  दोन जागांची गरज आहे. गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. कारण तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला समर्थन दिलयं. अतिरिक्त संख्याबळासाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी भाजपची बोलणीही सुरु केलीय. त्यामुळं आता भाजप राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.  गोव्यात 14 मार्च रोजी शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


पंजाब  निवडणूक निकाल 


पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची त्सुनामी आली आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा साप केला आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे.  पंजाबमध्ये 92 जागांवर आप आळे आहे. 


उत्तराखंड  निवडणूक निकाल 


उत्तराखंडमध्ये भाजपने सर्व पक्षांना मागे सोडत 49 जागांवर सर्वात मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून कडवी स्पर्धा मिळत आहे.  दुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


मणिपूर निवडणूक निकाल


मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीचे बहुते निकाल हाती आले असून यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. भाजप उमेदवार आतापर्यंत 60 पैकी 28 जागी विजयी झाले  आहेत. तर काँग्रेस 09, एनपीपी 09 आणि इतर 08 जागांवर आघाडीवर आहेत.


संबंधित बातम्या :