कोलकाता : कोलकात्यात भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान तुफान राडा झाला. तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषद आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे काही काळासाठी वातावरण तंग झालं होतं. अमित शाह यांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे ते सुखरुप आहेत.


कोलकात्यातील धर्मतल्ला भागातील शहीद मिनार मैदानातून अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात झाली. मेडिकल कॉलेजजवळ हा रोड शो आल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 'गो बॅक'चा नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते चिथावले.

तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रोड शोमधील काही वाहनांना आग लावण्यात आली. त्यानंतर अमित शाह यांचा रोड शो आवरता घेत त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीचार्ज करुन कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवलं.

'स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीला हार घालण्याचा कार्यक्रम प्रस्तावित होता, मात्र तो पूर्ण करता आला नाही. रोड शोमध्ये हंगामा झाल्यामुळे पोलिसांच्या गराड्यात आपल्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. मात्र पोलिसांनी याशिवाय कोणतीही मदत केली नाही. पोलिस केवळ बघ्याच्या भूमिकेत होते' असा आरोप अमित शाह यांनी 'एबीपी न्यूज'शी बोलताना केला.



तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आधी काळे झेंडे दाखवून विरोध केला. त्यानंतर रोड शोमधील वाहनांवर लाठ्या फेकण्यात आल्या. काही वाहनांना आग लावण्यात आली. दोन ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. ममता दीदी हिंसाचाराचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही शाहांनी केला.



अमित शाह यांनी कोलकात्यातील धर्मतल्ला भागातील शहीद मिनार मैदानातून सुरु झालेला रोड शो विवेकानंद हाऊसपर्यंत नियोजित होता, मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही.

गेल्या काही दिवसातल्या घटना पाहिल्या, तर भाजप आणि तृणमूलमधला वाढता संघर्ष स्पष्ट लक्षात येतो. फेब्रुवारीत ममता बॅनर्जींनी भाजपच्या योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान आणि शाहनवाज हुसैन यांचं हेलिकॉप्टर बंगालच्या धर्तीवर उतरुच दिलं नाही.
भाजपाध्यक्षांची सोमवारी होणाऱ्या रॅलीची परवानगी आयत्या वेळी रद्द करण्यात आली. इतकंच नाही तर फनी वादळाच्या पार्श्वभूमीवर मोदींची भेट घेण्यासही ममतांनी थेट नकार दिला होता.

गेल्या 8 वर्षांपासून पश्चिम बंगाल हा ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला आहे. आता हायव्होल्टेज ड्रामाची अखेर कशी होणार, हे 23 मे रोजीच स्पष्ट होईल.