नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर शेअर करणाऱ्या भाजप कार्यकर्ती प्रियांका शर्माची सुप्रीम कोर्टाने सुटका केली आहे. प्रियांकाने बॅनर्जी यांच्यावर तयार करण्यात आलेले मिम सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने तिला अटक करुन 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिची रवानगी केली होती. दरम्यान कोठडीतून सुटका झाल्यानंतर प्रियांकाने ममता बॅनर्जी यांची माफी मागावी, असेदेखील कोर्टाने सांगितले आहे.


प्रियांकाने ममता बॅनर्जी यांचा मॉर्फ केलेला एक फोटो सोशल केला होता. शहरी बोलीभाषेत अशा फोटोला 'मिम' असे संबोधले जाते. मिम शेअर केल्यानंतर प्रियांकाला पश्चिम बंगाल सरकारच्या आदेशांमुळे पोलिसांनी अटक केली होती.

अमेरिकेत पार पडलेल्या मेटगाला या फॅशन शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हजेरी लावली होती. प्रियांकाने या फॅशन शोमध्ये विचित्र मेकअप केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाऊ लागले. प्रियांकाच्या मेटगालामधील फोटोचे विविध प्रकारचे मिम्स भारतात सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले.

सेशल मीडियवरील मेमर्सनी मेटगालामधील प्रियांकाच्या फोटोमधील प्रियांकाचा चेहरा हटवून तिथे ममता बॅनर्जींचा चेहरा मॉर्फ करुन त्याचे मिम तयार केले. हे मिम सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. प्रियांका शर्मा यांनी हेच मिम फेसबुकवर शेअर केल्यामुळे पश्चिम बंगाल पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

प्रियांका शर्मा यांनी शेअर केलेलं ममता बॅनर्जी यांचं मिम



न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर प्रियांकाच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ढाल पुढे करत प्रियांकाने कोर्टासमोर तिची बाजू मांडली. प्रियांकाच्या कुटुंबीयांनी न्यायालयाला सांगितले की, पश्चिम बंगाल पोलिसांची राज्यात हुकूमशाही सुरु आहे. ते लोक कोणालाही तुरुंगात डांबून ठेवत आहेत.


सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशी इंदिरा बॅनर्जी यांनी सुरुवातीला प्रियांका शर्मा यांनी ममता यांची माफी मागावी असे म्हटले होते. परंतु प्रियांकाचे वकील नीरज किशन कौल यांनी त्यास विरोध केला. कौल म्हणाले की, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. एका छोट्याश्या गोष्टीसाठी 25 वर्षांच्या तरुणीला अटक करण्यात आली आहे, तसेच तिला माफी मागण्यास सांगितले जात आहे. जर प्रियांकाला माफी मागायला लावली तर, हे एक चुकीचे उदाहरण ठरेल. याचाच गैरफायदा घेत सर्वच सत्ताधारी पक्ष आपल्या विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना, नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवतील.