मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला 236 जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीला 49 जागांवर समाधान मानावे लागले आहे.  शिवसेना शिंदे गटाने 57 जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत (Shivsena) झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार निवडून आले आहेत. गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) आमदारांची बैठक बोलावण्यात आली. त्यांच्याकडून पाठींब्याबाबतची प्रतिज्ञापत्र लिहून खबरदारी घेण्यात आली. आता एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकले जात आहे. 
 
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षात मुख्यनेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत. पक्षातील सर्व नियम व अटी त्याचबरोबर पक्ष शिस्तीचे पालन केले जाईल, असा आशय या प्रतिज्ञा पत्रात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  


शिंदेंकडून विशेष खबरदारी?


ताज लँड्स येथे झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी गट नेता म्हणून एकमताने एकनाथ शिंदेंची निवड करत सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे सोपवले आहेत. मात्र तरीही शिंदेंकडून आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत. भविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये, याबाबत ही खबरदारी घेतली जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शिवसेना बंडाच्या केंद्रस्थानी राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आता सध्या प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकत असल्याचे दिसून येत आहे. 


एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार


दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत मोठं यश मिळावल्यानंतर मुख्यमंत्रि‍पदाबाबत महत्त्वाचं भाष्य केलंय. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही.मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीतून महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आणखी वाचा


Maharashtra Goverment: महायुती सरकारमध्ये कोण-कोण मंत्री होणार?; संभाव्य नावे आली समोर, राजकीय वर्तुळात उत्सुकता