मुंबई : वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम इथं झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या सर्व सातही खासदारांचं स्वागत आणि सत्कार केला. मुख्यमंत्री म्हणाले, हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना मला वेगळा आनंद आणि वेगळी भावना आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणूस हा बाळासाहेबांचा केंद्र होता. शिवसेना पूर्ण देशात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. 


शिवसेना वाढली ठाण्यात, कोकणात, संभाजीनगरमध्ये, महाराष्ट्रात. हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. हे बालेकिल्ले अबाधित राखले. कोणी म्हणाले ठाणे पडेल, कल्याण पडेल, पण आपण हे किल्ले २-२ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकलं.संभाजीनगर जिंकलं, कोकणात एकही जागा उबाठाला मिळू शकली नाही. हा विजय घासून-पुसून नाही, ठासून विजय मिळवला. 


धनुष्यबाण पेलण्याची ताकद मनगटात लागते, ती आपल्या शिवसेनेत आहे. त्यामुळेच शिवसेनेला लोकांनी मतदान केले. मतांसाठी ऐवढी कसली लाचारी. बाळासांहेबंच्या विचाराला तिलंदाजी दिली. त्यांचे विचार पायदळी तुडवले. लोकसभेच्या सात जागा आपण जिंकले. आपण तीन चार जागा आणखी जिंकलो असतो. आपण सहा जागा हरलो, त्यामध्ये का हरलो, त्यात जाऊ इच्छित नाही. आपल्याला महायुती मजबूत करायची आहे. मागचे सर्व विसरुन पुढे न्यायचं आहे. महायुतीमध्ये मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझी जबाबदारी सर्वात जास्त आहे. तुमच्या साथीने मी ती जबाबदारी पार पडेल, असा सर्वांना वचन देतोय, असे मुख्यमंत्री म्हणाले.


उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो म्हणणं टाळलं, काय म्हणाले एकनाथ शिंदे ? 


काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी आपण उठाव केला. मी सर्वांची भाषणं ऐकत होतो, दोन वर्षांपूर्वी आपण उठाव केला. तो खऱ्या अर्थाने आज निवडणुकीत जनतेने शिक्कामोर्तब करुन दाखवला. मतदारांनी विश्वास दाखवला, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही हा मी शब्द देतो. 


बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात तमाम हिंदू बांधवांनो अशी असायची. पण आज वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो म्हणणं टाळलं. कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? मतांसाठी एवढी कसली लाचारी? धनुष्यबाण पेलायची ताकद फक्त शिवसेनेच्या मनगटात आहे. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची अॅलर्जी आली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची लाज वाटतेय. 


खरी शिवसेना कुणाची? जनतेनेच सांगितलं 


ठाणे, कल्याण, कोकणात उबाठा साफ झाली. छत्रपती संभाजीनगरमध्येही उबाठा साफ झाली. मुंबईत चार जागा कशा गेल्या, हे सर्वांना माहित आहे, ते मला सांगायची गरज नाही. उबाठाचा स्ट्राईक रेट 42 तर आपला 47 टक्के इतका आहे. आपण उबाठापेक्षा सरस आहे. खरी शिवसेना कोणती? तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच सांगितले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.