Eknath Shinde MP Narendra Modi: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आलं आहे. याचदरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे.


एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ( Narendra Modi ) भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. शिवसेनेचे माजी खासदारही दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार आणि 4 माजी खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नरेंद्र मोदी आणि शिवसेनेच्या खासदारांच्या या भेटीमध्ये नेमकं काय घडतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्टींचा प्रयत्न-


सामोपचारानं दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्टींचा प्रयत्न केला जाणार आहे. वाटाघाटी करून महाराष्ट्रातील राजकीय पेचातून मार्ग काढला जाईल, असं सांगण्यात येत आहे.  वाटाघाटी पूर्ण केल्यानंतरच भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतरच निरिक्षक महाराष्ट्रात पाठवला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. तसेच आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा राजधानी दिल्ली इथं पाच वाजता शासकीय कार्यक्रम असल्यानं अमित शाह महाराष्ट्रात येण्याची शक्यता कमी आहे. 


मुख्यमंत्रिपदी कोण याची चर्चा सुरु असताना मागितली भेटीची वेळ-


विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालं. 288 पैकी 237 विधासभेच्या जागांवर महायुतीने विजय मिळवला. याचपार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या आजी-माजी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी वेळ मागितल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरु असताना मुख्यमंत्रि‍पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव कसं पुढे करता येईल, यासाठी खासदारांकडून प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामाची, विविध योजनांची माहिती यावेळी खासदारांकडून नरेंद्र मोदींना देण्यात येईल, असंही सांगण्यात येत आहे. 


मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असावेत, ही लोकांची इच्छा- दीपक केसरकर


एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ आज संपतोय म्हणून आज ते राजीनामा देत आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कदाचित त्यांना जबाबदारी मिळेल, असं शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर म्हणाले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहेत का, याबाबत माहिती नाही मात्र महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं. लोकांची इच्छा आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असावेत. आज मोठ्या संख्येने लोकं मुंबईत येतील अशी माहिती मिळाली. सर्वांना आवाहन करण्यात आल आहे मुंबईत येऊ नका, असंही दीपक केसरकरांनी सांगितलं. 


शिंदेंच्या खासदारांनी नरेंद्र मोदींची भेटीसाठी मागितली वेळ, Video:



संबंधित बातमी:


Maharashtra Goverment: महायुती सरकारमध्ये कोण-कोण मंत्री होणार?; संभाव्य नावे आली समोर, राजकीय वर्तुळात उत्सुकता