Satej Patil : महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत आणि आत्महत्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार थेट कारणीभूत असल्याची घणाघाती टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी केली. आज (16 नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा गांधी मैदानामध्ये आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये बोलताना सतेज पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला.
यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली
पाटील म्हणाले की इंदिरा गांधींची मध्यरात्री सभा ज्या ठिकाणी झाली होती, लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले होते आणि आजही त्याच पद्धतीने तुमचं (प्रियांका गांधी) या मैदानामध्ये उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे. 1976 मध्ये काळम्मावाडी धरणाचे लोकार्पण करण्यासाठी इंदिरा गांधी या ठिकाणी आल्या होत्या आणि आम्ही सुद्धा त्याच धरणातून कोल्हापूरसाठी पाणी देत असल्याचे आठवण सतेज पाटील यांनी यावेळी करून दिली. ते म्हणाले की, आम्ही फुले,शाहू, आंबेडकरांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. राज्यात फोडाफोडीचे राजकारण होत असताना ही निष्ठावंतांची फळी आपल्या स्वागतासाठी उभी असल्याचे ते म्हणाले. महिलांचा सन्मान न करण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याची टीका पाटील यांनी केली. राज्यांमध्ये महागाईने कंबरडं मोडलं आहे. कोट्यवधींचे प्रकल्प गुजरातला नेले आहेत आणि विद्यार्थ्यांची सुद्धा आंदोलने झाली आणि महायुतीच्या काळामध्ये राज्यातील इतिहासामध्ये सर्वाधिक आंदोलन झाल्याची टीका सुद्धा पाटील यांनी केली.
यावेळी बोलताना पाटील यांनी कोल्हापूर सांगली साताऱ्यासाठी कोणती विकासकामे केली जातील याबाबतचा अजेंडा वाचून दाखवला. कोल्हापूर सांगली साताऱ्यासाठी इंडस्ट्रियल काॅरिडाॅर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापूरात प्रचारसभा झाल्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान हल्लाबोल केला, राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यावे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला उत्तर देत प्रियंका गांधी म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षाची विचारधार वेगळी आहे पण बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाला नितांत आदर आहे, असे स्पष्ट सांगून शिवसेना वा काँग्रेसचा कोणताही नेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कदापी सहन करणार नाही असे बजावले. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यावे असे आव्हान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी खुल्या व्यासपीठावरून जातनिहाय जनगणना करणार व ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार ही घोषणा करुन दाखवावी, असे प्रतिआव्हानही प्रियंका गांधी यांनी दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या