मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत नेत्यांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यामुळे आता राज्यातील प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षानेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवार आहेत. पहिल्या यादात शिंदे गटाने काही जागांसाठी पक्षातील नेत्यांच्या मुलांना तसेच भावांना तिकीट दिले आहे.
शिवसेना पक्षात दुसरी पिढी सज्ज
महायुतीचा भाग असलेल्या भाजपाने याआधी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षानेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 45 नावे आहेत. या यादीत अनेक जागांवर राजकीय संबंध असणाऱ्या कुटुंबातच तिकीट देण्यात आले आहे. दर्यापूर, दापोली, राजापूर, पैठण अशा मतदारसंघांचा यात समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेतील (शिंदे गट) प्रस्थापित नेत्यांची पुढची पिढी राजकारणात येण्यास सज्ज झाली आहे.
कुठे मुलाला तर कुठे भावाला तिकीट
एकनाथ शिंदे यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघासाठी अभिजित अडसूळ यांना तिकीट दिले आहे. ते माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांचे पुत्र आहेत. एरंडोल या मतदारसंघासाठी शिंदे यांनी अमोल पाटील यांना संधी दिली आहे. ते चिमणराव पाटील यांचे पुत्र आहेत. पैठण या जागेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. या जागेसाठी शिवसेनेने विलास भुमरे यांना तिकीट दिले आहे. ते खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आहेत. कोकणातील दापोली या जागेसाठी योगेश कदम यांना तिकीट देण्यात आलंय. ते माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आहेत. कोकणातील राजापूर या जागेसाठी किरण सामंत यांना शिंदे यांनी संधी दिली आहे. ते मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. तसेच दिवंगत आमदार अनिल बाबर पुत्र सुहास बाबर यांनादेखील तिकीट देण्यात आलंय.
मनसे, वंचितकडूनही अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र या दोन्ही आघाड्यांनी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप घोषित केलेला नाही. बुधवारी (23 ऑक्टोबर) किंवा गुरुवारी (24 ऑक्टोबर) या दोन्ही आघाड्या याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपा, शिवसेना या दोन पक्षांव्यतिरिक्त मनसेनेही आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. वंचित बहुजन आघाडी या पक्षानेदेखील अनेक जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
हेही वाचा :