जालना: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अंतरवाली सराटीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मनोज जरांगे यांनी 'अभय' द्यावे, यासाठी हालचाली सुरु असल्याचे समजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे (Mangesh Chivte) यांनी अंतरवाली सराटीत नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सरसकट मराठा आरक्षणाची मागणी बारगळल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंगेश चिवटे यांच्यावरही आगपाखड केली होती. मात्र, तेच मंगेश चिवटे हे बुधवारी पहाटे पुन्हा मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
आंतरवाली सराटीत मनोज जरांगे आणि मंगेश चिवटे यांच्यात काही काळ चर्चा झाली. गेल्या 10 दिवसांतील मनोज जरांगे आणि मंगेश चिवटे यांची ही दुसरी भेट आहे. या भेटीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांची मनधरणी करत असल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करू नये, अशी विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडून जरांगे यांना करण्यात आल्याचे समजते. यावर आता मनोज जरांगे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांची विनंती मान्य केल्यास विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांच्याबाबत मनोज जरांगे यांचे धोरण आजवर नरमाईचे राहिले आहे. त्यामुळे ते आता एकनाथ शिंदे यांची त्यांच्या पक्षाविरोधात उमेदवार न देण्याची विनंती मान्य करणार का, हे पाहावे लागेल.
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मंत्री उदय सामंत यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे आणि पर्यायाने मराठा समाजाचा रोष कमी करण्याच्यादृष्टीने शिंदे गटाने हे पाऊल उचलल्याची चर्चा होती.
मराठा आरक्षणासंदर्भात 500 रुपयांच्या बॉण्डवर जो लिहून देईल त्याला पाठिंबा देणार असल्याचे सांगितल्यानंतर अंतरवली सराटीत उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनावणे, सुरेश वरपूडकर, संगीता ठोंबरे, राहुल पाटील, चंद्रकांत दानवे या बीड जिल्ह्यातील नेत्यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.
आणखी वाचा