जळगाव : शिवसेना-भाजप युतीचा निर्णय झाला, मात्र गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी युतीच्या 'घटस्फोटा'ची घोषणा करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची अनुपस्थिती जाणवत होती. खडसेंनी मात्र जळगावातून सेना-भाजप युतीचं स्वागत केलं आहे.

'मागच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी युती होऊ शकली नव्हती. कारण भाजपला  तेव्हा अनुकूल वातावरण होतं. त्यामुळे युती न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. पक्षाचा नेता म्हणून ती घोषणा करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती. तो निर्णय माझा एकट्याचा नव्हे, तर सर्वांचा होता' अशी आठवण खडसेंनी सांगितली.

'आज युती असायला हवी असा विचारप्रवाह असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युतीची घोषणा केली आहे. आज ते नेतृत्व करत आहेत. मागच्या कालखंडात युती नसताना विधानसभेत भाजपच्या 122 जागा आल्या होत्या. आमच्या वाट्याच्या 117 जागा होत्या.
जर युती तोडली नसती, तर भाजपचं सरकार आणि आमचा मुख्यमंत्री होऊ शकला नसता. मात्र आज युती झाल्याने मुख्यमंत्री युतीचा असेल' असं एकनाथ खडसे म्हणाले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची घोषणा शिवसेना आणि भाजपने केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23, तर भाजप 25 जागा लढणार आहे. विधानसभेसाठी घटकपक्षांशी चर्चा करुन उरलेल्या जागा शिवसेना आणि भाजप निम्म्या निम्म्या वाटून घेणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.