मुंबई : हो-नाही म्हणता म्हणता अखेर युतीचं जुळलंच! आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची घोषणा शिवसेना आणि भाजपने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23, तर भाजप 25 जागा लढणार आहे. विधानसभेसाठी घटकपक्षांशी चर्चा करुन उरलेल्या जागा शिवसेना आणि भाजप निम्म्या निम्म्या वाटून घेणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र यावेत, अशी जनभावना होती. या भावनेचा आदर राखत लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दोन्ही पक्ष 25 वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात वावरले. काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी सैद्धांतिक दृष्ट्या आम्ही दोघं हिंदुत्वाचा विचार मानणारे पक्ष आहोत. काही कारणास्तव 2014 च्या विधानसभेला एकत्र राहू शकलो नाही. पण आज काही लोक एकत्र येऊन संक्रमणाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी आम्ही राष्ट्रीय पक्ष एकत्र येत आहोत. सत्ता, पदं याला महत्त्व न देता शेतकरी, गरीबांचे व्यापक प्रश्न घेऊन आम्ही युतीचा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. व्यापक जनहितासाठी युतीचा निर्णय घेतला असून जागावाटप किंवा सतेसाठी घेतलेला नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.
सत्तेसाठी नव्हे, व्यापक जनहितासाठी आम्ही एकत्र आलोय : देवेंद्र फडणवीस

नाणार संदर्भात उद्योग विकासाला विरोध नाही, पण स्थानिकांना सोबत घेऊन निर्णय घेतला पाहिजे, या मागणीचा विचार करुन जिथे लोकांची मर्जी असेल, तिथेच प्रकल्प राबवण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे 500 चौरस फुटाच्या आत घरं असणाऱ्या रहिवाशांना करातून सूट देण्याचा निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.




राम मंदिराच्या मुद्द्यावर






उद्धव ठाकरे यांनी शहीदांना नम्रपणे आदरांजली अर्पण करुन युतीविषयी बोलायला सुरुवात केली. आपला देश लेचापेचा नाही आणि सडेतोड उत्तर देऊ अशी माझी अपेक्षा असल्याचं उद्धव म्हणाले. कर्जमुक्ती काही तांत्रिक अडचणींमुळे फसली होती, अनेक शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचले नव्हते. आता, राम मंदिराच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. राम मंदिराची जागा न्यासाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. नाणारचा प्रकल्प हलवल्याबद्दलही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

जागावाटप आणि जबाबदारीचं वाटप समसमान करु. आपला विचार, ध्येय, धोरण, दृष्टी एक आहे. तर गेली 50 वर्ष ज्यांच्याशी लढत आलो, त्यांच्या हातात हा देश द्यायचा का, हा प्रश्न आहे. शिवसेना-भाजप एकदिलाने एकत्र आले, तर हा एक मजबूत देश बनेल. समविचारी नाही तर काही अविचारी लोक एकत्र आले आहेत, अशा शब्दात महाआघाडीवर टीका करताना आम्ही साफ मनाने एकत्र येत असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

शिवसेना-भाजप युतीला 45 जागा : शाह

शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना मित्र आहे, युती करावी ही लाखो कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली, अशा भावना अमित शाह यांनी व्यक्त केल्या. शिवसेना-भाजप युती लोकसभेच्या 45 जागा जिंकेल, असा विश्वासही शाहांनी व्यक्त केला.

युतीची घोषणा करण्यासाठी अमित शाह खास मुंबईला आले होते. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ते विमानतळावरुन वांद्र्यातील सोफिटेल हॉटेलला गेले. या ठिकाणी अमित शाहांनी भाजप नेत्यांची बैठक घेतली. त्याच वेळी शिवसेनेच्या नेत्यांचीही बैठक झाली. बैठकीला संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

भाजप नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केल्यानंतर सर्वजण हॉटेल 'ब्ल्यू सी'ला रवाना झाले. विशेष म्हणजे एकाच गाडीतून चौघांनी हा प्रवास केला.
शिवसेना-भाजप लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी युती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

दुसरीकडे, हॉटेल 'ब्ल्यू सी'मध्ये युतीच्या पत्रकार परिषदेचा मंच सजला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासह दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची तस्वीर ठेवण्यात आली होती.

घोषणेसाठी भाजपची जम्बो टीम हजर होती. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पूनम महाजन पत्रकार परिषदेला हजर होते.

युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भोजनाचा बेत आयोजित करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीसांसोबत अमित शाह, पियुष गोयल, रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार 'वर्षा'वर गेले.