मावळ-शिरुरमध्ये युतीतील फूट कायम, भाजप आमदारांच्या गुप्त बैठकीची चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 26 Mar 2019 08:51 AM (IST)
शिवसेना-भाजप युतीचे मावळ लोकसभेतील उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरुर लोकसभेतील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील रोष भाजप नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त केला गेला.
पिंपरी चिंचवड : मावळ-शिरुर लोकसभेतील युतीत फूट कायम आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील भाजप नगरसेवकांची गुप्त बैठक पार पडली. युतीचे मावळ लोकसभेतील उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरुर लोकसभेतील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील रोष व्यक्त केला गेला. 'शिवसेनेच्या या दोन्ही खासदारांनी गेली दोन वर्षे आरोपांची सरबत्ती केली. अशा उमेदवारांचा प्रचार आम्ही करणार नाही', अशी भूमिका भाजप नगरसेवकांनी एकमताने घेतली. परंतु युतीचा धर्म पाळावा लागेल, अशी सावध भूमिका आमदार जगताप आणि लांडगे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र जगताप-बारणे यांच्यातील वैर आणि लांडगे-आढळराव यांच्यात श्रेयावरुन रंगलेलं शीतयुद्ध पाहता हे दोन्ही आमदार वर-वर युतीधर्म दाखवत असल्याचीच चर्चा आहे.