मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दुमत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेने 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे आता राज्याची विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला सरचिटणीस, पक्षाचे नेते उपस्थित होते. बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

राज ठाकरेंनी सगळ्या नेत्यांची मतं जाणून घेतली. निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी काही जणांनी केली आहे. परंतु राज ठाकरे लवकरच अधिकृत भूमिका मांडतील, अशी माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

निवडणूक लढवली पाहिजे, जेणेकरुन पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये पॉझिटिव्ह मेसेज जाईल. तसंच कार्यकर्ता पक्षासोबत राहिल, दुसऱ्या पक्षात राहणार नाही. निवडणूक लढलो नाही तर कार्यकर्ते पक्ष सोडून जातील, असं एक मतप्रवाह पक्षात आहे.

तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आजच्या घडीला निवडणूक लढवण्याचा निर्णय योग्य नाही, असं एका गटाला वाटतं. पैसा खर्च करुन निवडणूक लढवली आणि जागा निवडून आल्या नाहीतर तर त्याचाही परिणाम चांगला होणार नाही. त्यामुळे बेस व्यवस्थित करावा, असं दुसऱ्या गटचं मत आहे.