Dilip Walase Patil on Sharad Pawar : दिलीप वळसे पाटलांसारख्या गद्दारांना आता सुट्टी नाही. अशा गद्दारांचा पराभव करा,असं म्हणत शरद पवारांनी थेट आंबेगावमध्ये सभा घेत मानसपुत्रावर हल्ला चढवला. दरम्यान, संकटात सापडलेल्या दिलीप वळसेंवर पवारांच्या सभेनंतर पत्रकार परिषद रद्द करण्याची वेळ आली. पण सांगता सभेला म्हणजेच 18 नोव्हेंबरला आजच्या सभेतील आरोपांना उत्तरं देणार असल्याचं वळसे पाटलांना स्पष्ट केलं. आजच्या सभेत पवारांचे उमेदवार देवदत्त निकमांनी ही त्यांचे एकेकाळचे गुरु अन् आत्ताचे विरोधक वळसेंवर आरोपांची सरबत्ती केली. त्यामुळं वळसे पाटील नेमकं शरद पवारांच्या की देवदत्त निकमांच्या आरोपांना उत्तरं देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
शरद पवार काय काय म्हणाले?
ज्यांना मी पद दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नाही. माझी पत्नी वर्षातून एकदा भीमाशंकरला जाते, आत्ता अलीकडे ही ती भीमाशंकरला आली. मी विचारलं नेहमी सारखी व्यवस्था होती का? त्या म्हणाल्या यावेळी दिलीप वळसेंच्या घरी गेलीच नाही, थेट भीमाशंकर दर्शन घेऊन परतले.आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली.
ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.
दिलीप वळसेंचा मंत्री पदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळं - शरद पवार
आंबेगाव तालुक्याचं अन माझं एक अतूट नातं आहे. अगदी दिलीप वळसेंना इथून मी संधी देण्याआधी पासून माझं या तालुक्याशी संबंध येत गेलाय. दिलीप वळसेंना मी संधी दिली, ते आमदार झाले याचा मला आनंद होता. पुढं मी त्यांना मंत्री केलं. विविध पदं दिली. विश्वास ठेवला, संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं, असंही शरद पवार म्हणाले.
दिलीप वळसेंची कारकिर्द
- शरद पवारांचे स्वीय सहाय्यक
- मग सलग 35 वर्षे आंबेगाव विधानसभेतून आमदार
- पैकी 25 वर्षे विविध पदं भूषवली
- वैद्यकीय शिक्षण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, ऊर्जा मंत्री, अर्थ मंत्री, गृहमंत्री अशी विविध पदं भूषवली
- विधानसभा अध्यक्ष ही राहिलेत
इतर महत्त्वाच्या बातम्या