Dilip Sopal Meets Manoj Jarange Patil : गेल्या 2 महिन्यांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यामध्ये मोठा वाद रंगला होता. दरम्यान, राजेंद्र राऊत यांचे विरोधक आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी थेट अंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सोपल यांनी राऊतांविरोधात मोठी खेळी केली असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेकडून दिलीप सोपल यांना बार्शीतील उमेदवारी देण्यात आली आहे. तर राजेंद्र राऊत शिंदेंच्या धनुष्यबाणावर मैदानात उतरले आहेत.


दिलीप सोपल यांनी मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत मांडलेल्या भूमिकेची माहिती मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली आहे. सोपल यांनी मनोज जरांगेंचा सत्कार करत भगवंताची मूर्ती भेट दिली आहे. यावेळी सोपलांचे अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे यांच्यात वाद झाल्यानंतर दिलीप सोपलांनी घेतलेली ही भेट बार्शीच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरु शकते. 


मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी केली होती. त्यावर राजेंद्र राऊत यांनी विरोधी पक्षातील नेत्यांकडून लिहून घ्या, असं आवाहन मनोज जरांगेंना केलं होतं. याशिवाय मी सत्ताधारी पक्षाकडून लिहून घेतो, तुम्ही विरोधी पक्षातील नेत्यांकडून लेखी घ्या, असंही राऊत म्हणाले होते. याच मुद्यावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बार्शीत आंदोलनालाही बसले होते. 


मनोज जरांगेंच्या सांगण्यावरुन बार्शीत युवराज काटे आणि आनंद काशीद यांचा उमेदवारी अर्ज 


बार्शी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने माजी मंत्री दिलीप सोपल यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने सोपल यांच्याविरोधात राजेंद्र राऊत यांना मैदानात उतरवले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार रिंगणात असताना बार्शीतील मनोज जरांगेंच्या समर्थकांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बार्शीत उपोषण करणारे आनंद काशीद आणि बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे यांनी बार्शीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिथे माझ्या अर्ज भरले आहेत, त्याठिकाणी सर्वांनी एकत्रित बसा आणि एकच उमेदवार ठरवा, अशा सूचना मनोज जरांगे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, आता 3 तारखेला बार्शीत मनोज जरांगे कोणाला निवडणुकीच्या मैदानात उतरवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Muhurat Trading 2024: मुहूर्त ट्रेडिंगला भारतीय शेअर बाजारात तेजी, ऑटो कंपन्या-बँकांच्या शेअरमध्ये उसळी, गुंतवणूकदार मालामाल