सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, दिलीप माने यांना काँग्रेसकडून अखेरपर्यंत उमेदवारी अर्ज दिला गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. 


सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात दिलीप माने यांना काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेलं असताना देखील अद्याप एबी फॉर्म दिला नाही. माजी आमदार दिलीप माने जोरदार शक्तीप्रदर्शन करतं आज अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात पोहोचले. मात्र, अद्याप एबी फॉर्म न मिळाल्याने दिलीप माने  यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.  


माजी आमदार दिलीप माने यांना काँग्रेसने सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी घोषित केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सोलापूर दक्षिण मतदारसंघातून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करत एबी फॉर्म दिलेला होता.  त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट असा वाद रंगलेला होता.


दिलीप माने आणि अमर पाटील यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता होती, मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळत एबी फॉर्म दिला नसल्याची बाब समोर आलं आहे.  


दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी  काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत माझं नाव होतं, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी  शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म  उपलब्ध झाला नाही, असं म्हटलं. 


मी आज वरिष्ठांशी संपर्क साधला असता आज सकाळपर्यंत एबी फॉर्म उपलब्ध राहील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, एबी फॉर्म मिळाला नाही. यानंतर  काही तरी गोंधळ सुरु आहे लक्षात आल्यानं अपक्ष अर्ज भरला आहे, अशी माहिती दिलीप माने यांनी दिली.  


दिलीप माने म्हणाले की, मी निश्चितपणे अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन 4 तारखेपर्यंत निर्णय घेणार आहे, असंही ते म्हणाले. 


एबी फॉर्म होता पण पोहोचवला नाही


मला शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघण्यासाठी सांगण्यात आलं. ऐन वेळी मला एबी फॉर्म दिला नाही.एबी फॉर्म होता पण माझ्यापर्यंत पोहोचवला नाही, असं दिलीप माने म्हणाले.  मी आता अपक्ष अर्ज दाखल केला, कार्यकर्त्यांना विचारून अर्ज ठेवण्याबाबत निर्णय घेईन, असंही माने यांनी सांगितलं. 


काँग्रेसचा हक्काचा मतदार संघ असताना ती जागा मित्रांना सोडली ही सगळी मॅच फिक्सिंग आहे.प्रत्येक जण आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करतोय.आपली मुलगी, पत्नी कशी निवडून येईल या साठी सगळं केलं जातंय, असा आरोप देखील दिलीप माने यांनी केला.


ज्यांनी तिकीट जाहीर केलं त्यांची जबाबदारी होती एबी फॉर्म देखील आणला पाहिजे,त्यामध्ये सगळेच कमी पडलेत, असं दिलीप माने म्हणाले. जिथं काँग्रेस उमेदवारला जिथं संधी न देता मित्र पक्षाला जागा सोडण्यात आली तिथं कोणीही विश्वास ठेवू नका, असं दिलीप माने म्हणाले. 


दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवरुन तिढा कायम आहे. पंढरपूरच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा मतदारसंघात देखील ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आले आहेत. 


इतर बातम्या : 


Satyajeet Tambe : '...तर आम्ही तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही'; सत्यजित तांबेंनी सुजय विखेंवर डागली तोफ