पुणे: पुणे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली असतानाच, मात्र आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील पक्षांनी एबी फॉर्म देण्यात आला होता. ते वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, जगदीश मुळीक यांनी यु टर्न घेतला आहे.


नेमकं काय घडलं?


भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आला. ते फॉर्म घेऊन अर्ज भरण्यासाठी येरवड्याच्या क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाले. मात्र उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणीस यांचा फोन आला आणि जगदीश मुळीक यांनी यु-टर्न घेतला. वरिष्ठांनी आदेश दिले भाजपात दिलेल्या आदेशांचं पालन केलं जातं. आम्हाला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायचा आहे म्हणून मी अर्ज भरणार नाही असं जगदीश मुळीक यांनी जाहीर केलं.


जगदीश मुळीक यांच्यासोबत आलेले शेकडो कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जगदीश मुळीक तुम्ही फॉर्म भरा आणि तुमच्या सोबत आहोत अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


नेमकं काय म्हणालेत जगदीश मुळीक?


फॉर्म भरत असताना देवेंद्र फडणवीसांचा फोन आला. फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर आम्ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवली आहे. भाजप पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली त्याबाबत पक्षांचं आणि पक्षातील नेत्यांचा मी आभारी आहे, पक्ष मला जो आदेश देईल त्याचं मी पालन करणार आहे, मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. 


सुनील टिंगरे यांना महायुतीकडून उमेदवारी


वडगाव शेरीचे विद्यमान उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे सुनील टिंगरे आहेत. टिंगरे यांचं नाव कल्याणीनगरच्या पोर्शे प्रकरणात आल्याने त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र टिंगरेंचं नाव दुसऱ्या उमेदवार यादीमध्ये जाहीर झालं. त्यानंतर पुन्हा जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप सुरुवातीपासून आग्रही होते. त्यानंतर जगदीश मुळीक यांना भाजप पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यानंतर ते फॉर्म भरण्यासाठी गेले असता त्यांना फडणवीसांचा फोन आला त्यानंतर त्यांना फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवली.