नवी दिल्ली : एका उमेदवाराला मत दिलं, पण व्हीव्हीपॅटच्या पोचपावतीवर दुसऱ्याच उमेदवाराचं नाव आलं, असा दावा हरेकृष्ण डेका यांनी केला आहे. तुरुंगवारीच्या भीतीने तक्रार केली नसल्याचं डेका यांचं म्हणणं आहे. हरेकृष्ण डेका हे कुणी ऐरेगैरे प्रसिद्धीला हपापलेले स्टंटबाज नाहीत, तर ते आसामचे माजी पोलिस महासंचालक आहेत.

लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यात 23 तारखेला 15 राज्यातील 117 जागांसाठी मतदान पार पडलं, त्यात आसाममधल्या चार जागांचाही समावेश होता. हरिकृष्ण डेका हे लचित नगरच्या एलपी स्कूलच्या मतदान केंद्रावर मतदानाला गेले होते. त्यांनी मतदान केलं, मात्र व्हीव्हीपॅटच्या पावतीत दुसऱ्याच उमेदवाराचं नाव आलं, असा दावा डेका यांनी केला आहे.

डेका यांनी ही बाब निवडणूक अधिकाऱ्याला सांगितली, अधिकाऱ्यांनी त्यांना तशी तक्रार देण्यास सांगितलं, मात्र तक्रारीत तथ्य आढळलं नाही तर नियमानुसार शिक्षा होईल असं सांगायलाही ते विसरले नाहीत. हे सगळं सिद्ध कसं होणार, याची खात्री नसल्याने डेका यांनी तक्रारीचा नादच सोडून दिला.

VIDEO | ईव्हीएम मशीनच्या वापरावर विरोधकांचा अविश्वास | मुंबई | एबीपी माझा



काय आहे व्हीव्हीपॅट?  

जेव्हापासून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा उपयोग आपल्या निवडणुकांमध्ये सुरु झाला तेव्हापासून त्यावर शंका उपस्थित करणंही सुरु झालं आणि कदाचित ते सुरुच राहील. त्यामुळेच मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट म्हणजेच पोचपावती यंत्र जोडण्याचा उपाय समोर आला. लोकसभेसाठी यावेळी पहिल्यांदाच अनेक मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट यंत्र ईव्हीएमला जोडली गेली.

तुम्ही ज्या उमेदवारासमोरचं बटन दाबलंय, त्यालाच मत गेलंय की नाही हे कळायला मार्ग नसायचा. पण व्हीव्हीपॅटमुळे ते कळणं शक्य झालंय. तुम्ही ईव्हीएमचं बटन दाबल्यावर, सोबतच्या व्हीव्हीपॅटच्या काचेत तुम्हाला एक चिठ्ठी दिसते त्यावर तुम्ही मत दिलेल्या उमेदवाराचंच नाव तुम्ही पाहू शकता. जर तसं नसेल तर तुम्ही तक्रार करु शकता.

VIDEO | आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा समावेश, निवडणुक आयोगाची प्रात्यक्षिक | पिंपरी | एबीपी माझा



नियम काय आहे?

निवडणूक आयोगाच्या मॅन्युअलमध्ये व्हीव्हीपॅटच्या तक्रारीबाबत विस्ताराने माहिती दिली आहे. जर तुम्हाला पोचपावतीमध्ये गडबड आढळून आली तर तुम्ही प्रिसायडिंग अधिकाऱ्याकडे तक्रार द्या. तक्रार चुकीची आढळली तर तुम्हाला दंड द्यावा लागेल याची कल्पना तो अधिकारी तुम्हाला देतो. त्यानंतर सर्वांसमक्ष तुम्हाला पुन्हा टेस्ट व्होटिंग करायला सांगितलं जातं, तुम्ही दिलेलं मत आणि व्हीव्हीपॅटवरील मत वेगळं आढळलं तर त्या केंद्रावरचं मतदान थांबवलं जातं. पण जर तक्रार खोटी आढळली तर सहा महिने कारावास किंवा दहा हजाराचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.

हरिकृष्ण डेका यांच्याप्रमाणेच केरळमध्येसुद्धा एबीन बाबू नावाच्या तरुणाने दावा केला होता. त्याने रितसर तक्रार सुद्धा दाखल केली. त्यानुसार निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली सर्व टेस्ट करुन खातरजमा करुन पाहिली. त्यांना बाबूच्या तक्रारीत तथ्य आढळलं नाही, खोटी माहिती दिल्यामुळे बाबूला कलम 177 अन्वये अटक करण्यात आली, नंतर त्याची जामीनावर सुटका झाली.

शिक्षेच्या तरतुदीमुळे खोडसाळ लोकांवर अंकुश बसेल, मतदान प्रक्रियेत विनाकारण कुणी अडथळा आणणार नाही, हा चांगला इफेक्ट असला तरी हरिकृष्ण डेकांसारखे माजी डीजीपीसुद्धा तक्रार द्यायला धजत नसतील, तर सामान्य लोक तक्रार देताना हजारदा विचार करतील हा साईड इफेक्ट जास्त चिंताजनक आहे. त्यामुळे 'आहे व्हीव्हीपॅट तरी गमते उदास' अशी अवस्था काही मतदारांची आणि ईव्हीएमवर विश्वास नसणाऱ्यांची झाली असेल.