धुळे : धुळे महापालिकेच्या स्थापनेनंतर 15 वर्षाच्या कालावधीत भाजपची प्रथमच एकहाती सत्ता आली आहे. भाजपला सर्वाधिक म्हणजेच 49 जागा मिळाल्या आहेत. एकहाती सत्ता मिळाल्याने साहजिकच महापौर भाजपचाच आहे. धुळे महापालिकेचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपचे नगरसेवक प्रदीप कर्पे, नगरसेविका भारती माळी, नगरसेवक शीतल नवले, हर्ष रेलन यांची नावं सध्या चर्चेत आहेत. महापौरपदाच्या या शर्यतीत राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या दोन सदस्यांची नावंही अग्रस्थानी आहेत.


सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन गरमा-गरमीचा असलेला माहोल लक्षात घेता ओबीसी वर्गाच्या उमेदवाराला धुळे महापालिकेच्या महापौरपदी विराजमान करुन धुळे शहरातील ओबीसी समाजाला खुश करण्याचा हा प्रयत्न असल्याची सध्या चर्चा आहे.

भाजपचे प्रदीप कर्पे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते. नगरसेवकपदाचा यापूर्वीचा त्यांचा अनुभव लक्षात घेता प्रदीप कर्पे यांचं नाव 'टॉप फोर'मध्ये आहे. माजी आणि सध्याच्या विद्यमान नगरसेविका भारती माळी यांचं महिला उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे. महापौरपदासाठी महिला उमेदवाराला प्राधान्य देण्याचा विचार असल्यानं भारती माळी यांच्या नावाचीही चर्चा आहे .

धुळे महापालिकेचे माजी महापौर मोहन नवले यांचे पुत्र शीतल नवले हे नगरसेवकपदी प्रथमच निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या शीतल नवलेंसह आणखी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे हर्ष रेलन यांचं.

साधारण 15 दिवसांच्या आत महापौरपदाच्या निवडीसाठी महापालिकेची विशेष महासभा होऊन त्यात महापौर कोण, हे निश्चित होईल. त्यामुळे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

धुळे महापालिकेतील पक्षीय बलाबल  : (74)

भाजप  - 49
राष्ट्रवादी - 09
काँग्रेस - 05
सपा  - 02
शिवसेना - 02
लोकसंग्राम - 01
बसपा - 01
एमआयएम - 03
इतर - 02

एकूण 19 प्रभाग