पालघर : पालघरमधील लोकसभेच्या जागेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे पालघरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.


पहिल्यांदाच माकपकडून पालघर लोकसभेची जागा लढवली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण अ. भा. किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी दिलं. पालघर मधील मनोरमध्ये आज बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि अशोक ढवळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.

दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी माकप आग्रही असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून ही जागा दिली गेली नाही. त्यामुळे माकपकडून पालघरसाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करण्यात आला. तर दिंडोरीत बहुजन विकास आघाडीकडून माकपला सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिलं.

सत्तेतील शिवसेना-भाजपला हरवणं हे एकमेव उद्दिष्ट असून वेगळे लढल्याने माकप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांचं नुकसान होणार, अशी या दोन्ही पक्षांची भूमिका होती. भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक झाल्यामुळे भाजप सरकार विरोधात एकत्र आल्याचं मत दोन्ही पक्षांकडून व्यक्त करण्यात आलं.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड तालुके माकपचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी दोन्ही पक्ष वेगळे लढल्याने बहुजन विकास आघाडी तिसऱ्या, तर माकप चौथ्या क्रमांकावर राहिली होती. मात्र या लोकसभेत माकप आणि बहुजन विकास आघाडी एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हमखास विजय होतील असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.