शिर्डी : सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे चर्चेत आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली, मात्र विजेतेपदासाठी कांबळेंना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे मधुकर पिचड या दिग्गज नेत्यांचा समावेश असलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे.
यावेळी सुजय विखे यांच्या भाजपवारीमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसला आव्हान आहे, ते आपल्याच पक्षातील गट-तट संपवण्याचं. बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांच्यातील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे.
भाऊसाहेब कांबळे हे विखे समर्थक समजले जातात. सुजय यांच्या भाजपप्रवेशानंतर विखेंनी नगरमध्ये कोणाचाच प्रचार न करण्याची भूमिका केली होती, मात्र आता त्यांचे समर्थकच शिर्डीतून रिंगणात उतरले, तर विखे काय करणार, हे सांगता येत नाही.
अहमदनगर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नव्याने निवड झालेले करण ससाणे आणि कांबळे यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर भाजप उमेदवाराआधी आव्हान असेल आपल्याच पक्षातील नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचं.
शिर्डीत काँग्रेसचा उमेदवार जाहीर, मात्र गटा-तटाचं राजकारण सांभाळताना नाकी नऊ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2019 05:43 PM (IST)
काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे मधुकर पिचड या दिग्गज नेत्यांचा समावेश असलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ, मात्र लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर गटातटाचं राजकारण सांभाळताना काँग्रेसला कसरत करावी लागणार आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -