Dharashiv Nagarparishad Election Result 2025: राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज (दि. 21 डिसेंबर) पार पडत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली असून, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक ठिकाणी विजयाच्या तयारीला सुरुवात झाली असून, काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तर धाराशिवमध्ये (Dharashiv Nagarparishad Election Result 2025) निकालापूर्वीच भाजपकडून (BJP) गुलालाची खरेदी करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

Dharashiv Nagarparishad Election Result 2025: राणाजगजितसिंह पाटील, ओमराजे निंबाळकरांच्या प्रतिष्ठेचा आज फैसला

धाराशिवमध्ये निकाल जाहीर होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाकडून विजयाची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संपर्क कार्यालयात गुलालाच्या गोण्या आणून ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून वापरण्यात आलेले एक गाणे वापरत ‘मल्हार पाटील फॅन क्लब’ या सोशल मीडिया पेजवर गुलालाच्या पोत्यांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. धाराशिव नगरपरिषदेत शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात थेट सामना होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा स्वतंत्र उमेदवार रिंगणात असल्याने येथे तिरंगी लढत निर्माण झाली आहे. या निवडणुकीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tuljapur Election 2025: तुळजापुरमध्ये कडेकोट बंदोबस्त 

दरम्यान, तुळजापुरातील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी नळदुर्ग रोडवर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. सावरकर चौक ते हेलिपॅड कॉर्नर या रस्त्यावर सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवेशबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून, मतमोजणीसाठी तुळजापुरात तीन स्तरांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक, एसआरपीएफची टीम, तसेच तीन पोलीस पेट्रोलिंग वाहनांद्वारे दिवसभर शहरात गस्त घातली जाणार आहे. यासोबतच सुमारे 100 पोलीस कर्मचारी, 10 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 60 होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Continues below advertisement

Tuljapur Election 2025: तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणी

तुळजापुरातील नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडत आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर आणि भाजपचे उमेदवार पिटू गंगणे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादाचे रूपांतर राड्यात झाले. या घटनेत गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याचा गंभीर प्रकार घडला होता. या प्रकरणी काँग्रेस उमेदवार अमर मगर यांचे बंधू तसेच हल्ल्यात जखमी झालेले कुलदीप मगर यांच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tuljapur Election 2025: पोलिस प्रशासन सज्ज

राज्यभरात निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी उत्साहासोबतच तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असून, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

आणखी वाचा 

Beed Nagarparishad Election Result 2025: बीडमध्ये अजितदादा, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला; परळीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ? नगरपरिषद निकालाकडे राज्याचं लक्ष