Continues below advertisement

Beed Nagarparishad Election Result 2025: बीड जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या (Beed Nagarparishad Election) मतमोजणी प्रक्रियेला आज सकाळी दहा वाजता सुरुवात होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचेही लक्ष लागले असून, प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बीड नगरपरिषदेची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पार पडणार असून, यासाठी एकूण 18 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर गेवराई नगरपरिषदेची मतमोजणी नगरपरिषद इमारतीमध्येच होणार असून, तेथे 15 टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला

या नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असून, त्यांनी स्वतः जिल्ह्यातील प्रत्येक नगरपरिषदेच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे या निकालांकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

Continues below advertisement

BJP: बीड नगरपरिषदेत भाजपचा मोठा डाव

बीड नगरपरिषदेत प्रथमच भाजपाने तब्बल 52 जागांसह नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, भाजप नेते योगेश क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी सत्ता काबीज करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत.

Beed Nagarparishad Election Result 2025: मतमोजणीपूर्वी कोणाचे पारडे जड?

बीड नगरपरिषदेत भाजपच्या ज्योती घुंबरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या स्मिता विष्णू वाघमारे यांचे पारडे सध्या जड मानले जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रेमलता पारवे यांना मतदारांनी कौल दिला आहे का, हे आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. तर गेवराई नगरपरिषदेत भाजपच्या गीता बाळराजे पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या शीतल दाभाडे यांच्यात थेट लढत होत आहे. सध्याच्या अंदाजानुसार गेवराईत भाजपच्या गीता पवार यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.

Beed Nagarparishad Election Result 2025: परळीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

नगरपरिषद मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीत मतमोजणी होत असल्याने आज वैद्यनाथ मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी स्ट्रॉंगरूमबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गोंधळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आज ‘अलर्ट मोड’वर असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

Beed Nagarparishad Election Result 2025: भाजपचा आत्मविश्वास; जिल्ह्यात कमळ फुलणार

दरम्यान, मतमोजणीच्या दिवशी भाजपने मोठा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बीड जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलणार असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. परळीतही महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी याच नगराध्यक्ष होतील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता बीडच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती