बीड: उतणार नाही मातणार नाही, तुम्ही दिलेला जनसेवेचा आणि जन संघर्षाचा वारसा सोडणार नाही, असे म्हणत बहिण पंकजा मुंडे यांचा पराभव करत विधानसभा गाठणाऱ्या धनंजय मुंडे यांनी आज स्व.गोपीनाथराव मुंडे, स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले.


परळी विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी  स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथगड या समाधीस्थळी जाऊन नमन केले. तसेच वडील स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊनही त्यांनी नमन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही त्यांनी समाधीस्थळी जात आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर विजयानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी या दोन्ही ठिकाणी जाऊन नमन केले.

स्व.मुंडे साहेब आणि स्व.अण्णांच्या आठवणीने भावूक होताना त्यांनी उतणार नाही मातणार नाही, स्व.मुंडे साहेब आणि स्व.अण्णांकडून आपल्याला मिळालेला जनसेवा करण्याचा आणि जन संघर्षाचा वारसा सोडणार नाही, असे सांगितले.

दरम्यान, परळी विधानसभेची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली.  त्याचबरोबर जिल्ह्यातून धनंजय मुंडे यांना स्वतःसह माजलगावमधून प्रकाश सोळंके, बीडमधून संदीप क्षीरसागर आणि आष्टीतून बाळासाहेब आजबे यांनाही निवडून आणण्यात यश आले आहे. याशिवाय मुंडेंनी सभा घेतलेल्या बहुतांश जागी आघाडीचे उमेदवार विजयी झाले असल्याचे चित्र आहे.

धनंजय मुंडे हे स्वतःच्या मतदारसंघात माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध लढले.  अगदी अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी खासदार उदयनराजे भोसले, शहनवाज हुसेन यांच्यासह भाजपची मोठी फौज विरोधात असूनही मोठ्या मताधिक्याने जिंकले. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारक म्हणून मुंडेंनी राज्यात जवळपास 40 सभा घेतल्या.