चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 103 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 50 जागा मिळाल्या आहेत. तर 13 अपक्षांना मतदारांनी त्यांचा आमदार म्हणून निवडले आहे. या निवडणुकीत प्रमुख पक्षांनी स्वतःचे जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध केल्यानंतर राज्यभरातले स्थानिक पक्ष आणि अपक्षांनीदेखील त्यांची घोषणापत्र प्रसिद्ध केली होती. तसेच त्याचे मतदारसंघांमध्ये वाटपही केले होते.

चंद्रपूरच्या चिमूरमधल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवाराने घोषणापत्र वाटले. त्यातले प्रमुख आश्वासन वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याची राज्यभरात जोरदार चर्चादेखील झाली. वनिता राऊत यांनी 'गाव तिथे बार', असं आश्वासन दिलं होतं.

निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर 'गाव तिथे बार' असं आश्वासन देणाऱ्या त्या उमेदवाराचे काय झाले? ती उमेदवार जिंकली का? तिला किती मतं मिळाली? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत. या निवडणुकीत वनिता राऊत यांचा पराभव झाला आहे. तसेच त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. वनिता राऊत यांना एकूण 286 मतं मिळाली आहेत.

चिमूरमधून भाजपचे बंटी भांगडिया विजयी झाले आहेत. त्यांना 87 हजार 146 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांना 77 हजार 394 मतं मिळाली आहेत. ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

वनिता राऊत यांनी आपण निवडून आल्यास गडचिरोलीतील दारुबंदी हटवू असे आश्वासन दिले होते. मतदारसंघातली बेरोजगारी कमी करण्यासाठी तरुणांना दारु विकण्याचे परवाने देऊ, दारिद्र्य रेषेखाली असणार्‍या लोकांना दारू खरेदी करताना सवलत देऊ, गाव तिथे बार सुरु करु, अशी अनेक अश्वासने दिले होते. तसेच 'गाव तिथे बार' ही योजना राज्यभरात सुरु करावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

व्हिडीओ पाहा



वनिता राऊत यांचे घोषणापत्र पाहा