बीड : उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाला सोडून जाणं हा पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा अपमान आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघातील जनता हा अपमान विसरणार नाही. याचा बदला या निवडणुकीत जनताच घेईल असा विश्वास एबीपी माझाशी बोलताना धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला आहे.


मुंडे म्हणाले की, मुंदडांचा आजच्या भाजप पक्ष प्रवेशाची निश्चिती ही लोकसभा निवडणुकीपूर्वीच झाली होती. धनंजय मुंडे यांच्यामुळे राष्ट्रवादी सोडत असल्याचा आरोप यावेळी मुंदडांनी केला होता, त्याला देखील मुंडे यांनी उत्तर दिले. मुंडे म्हणाले की, विमलताई हयात होत्या तोपर्यंत पवार साहेबांनी त्यांना कायम सत्तेत ठेवलं. मुलांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता. मात्र अचानकपणे बीडमध्ये शरद पवारांनी त्यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर त्यांनी साहेबांचा फोटो राष्ट्रवादीचं नाव सुद्धा सोशल मीडियावर वापरलं नाही. यावेळी त्यांची गोची झाली. त्यातून मग काय करायचं कोणाला नाव ठेवायचं तर मग धनंजय मुंडे यांनाच नाव ठेवायचा पर्याय शोधला आणि पक्ष सोडला.

मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी कधीच पक्षाचा मालक झालो नाही. मला मालक व्हायची इच्छाही नाही. ती माझी गरज नाही आणि महत्त्वाकांक्षा सुद्धा नाही. प्रामाणिकपणे मी पक्ष मजबूत करण्याचे काम करतोय, असे मुंडे म्हणाले.

मुळात हे नेते जे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेत. ते नेते पक्षात असताना मी कधीही त्यांना विचारल्याशिवाय मतदारसंघातही गेलो नाही. हे लोकं फक्त सत्तेची लालची आहेत आणि पक्षातून जाताना काय नाव ठेवायचं तर फक्त धनंजय मुंडेला वाजवायचं हा एकच कार्यक्रम या नेत्यांनी पुढे केला, असे ते म्हणाले.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर मात्र त्यांना त्यांची अडचण झाली कारण मी पक्षात असताना यांना इन्डायरेक्ट मदत करणं जमत नव्हतं म्हणून अखेर धनंजय मुंडे नाव ठेवून ही मंडळी बाहेर गेली मी पक्षाचा एक कार्यकर्ता प्रामाणिक काम करणारा निष्ठावान आहे त्यामुळे अशा कितीही नेत्यांनी मला नाव ठेवलं तरी माझ्या कामात काहीही फरक पडणार नाही

पक्ष सोडून गेलेले नेते भाजप पक्षाला अप्रत्यक्ष मदत करायचे. मी पक्षात आल्यानंतर ती मदत उघडी पडू लागली. मी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर कधीही विरोधी पक्षनेता म्हणून वागलो नाही. हे गेलेली मान्यवर नेते आहेत. तेच माझे नेते समजून मी जिल्ह्यात वागायचो, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

देशातली पार्टी विथ डिफ्रान्स म्हणणारी भारतीय जनता पार्टी एखाद्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार म्हणून घोषित करते. त्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीमध्ये घेते. अशी वेळ इतिहासमध्ये कधीही आलेली नव्हती, असेही ते म्हणाले.

मी अक्षय मुंदडा यांचे भाषण ऐकलं. माझ्या आईने हात धरून सांगितले जाताना की वेळ पडली तर राजकारण सोड, पण पवार साहेबांना कधी सोडू नको. एवढे उपकार आदरणीय पवार साहेबांचे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माझ्याकडे व्हाईस रेकॉर्डिंग सर्व पुरावे आहेत, असेही ते म्हणाले.  जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे नेते सोडून गेले या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी कशा पद्धतीने फोनवर प्रचार केला याचे व्हाईस रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहेत. लोकसभेच्या प्रचारादरम्यान त्यांनी काय भाषणे केली हे आपणा सर्वांना ठाऊक आहे, असेही मुंडे म्हणाले.

लोकसभेची अंबाजोगाईची जबाबदारी संपूर्ण मुंदडांवर दिली होती. तिथं त्यांनी काय केलं हे तुम्ही तपासा. त्यांनी भाजपशी अंतर्गत सर्व गोष्टी जुळवून घेतल्या. आजच्या प्रवेशाची निश्चिती लोकसभेच्या अगोदरच झालेली होती. श्रद्धा आणि विश्वासापोटी पवार साहेबांनी आम्हाला आदेश दिला की नमिता मुंदडा यांना निवडून आणले पाहिजे. त्यादिवशी बीडमध्ये येऊन  आमची उमेदवारी जाहीर केली. हे आम्ही नशीब समजतो. हे भाग्य यांना सुद्धा मिळाले ते त्यांना टिकवता आले नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.