काय म्हटले आहे पत्रकात
राज्यात गेली 5 वर्ष यशस्वीपणे राज्यकारभार करीत महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात केले आणि आता लोकशाही परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्रपक्षांचे नेते सर्वश्री केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्याच झालेल्या चर्चेअंती महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ही महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यानुसार आम्ही महायुतीची घोषणा करीत आहेत.
या महायुतीत कोणता पक्ष कोणती व किती जागा लढविणार, इत्यादी तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ही महायुती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशीर्वाद प्राप्त करेल, हा विश्वास आम्ही व्यक्त करीत आहोत.
या पत्रकावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सह्या आहेत. दरम्यान, हे पत्रक येण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी महायुतीची घोषणा केली होती. संपूर्ण महाराष्ट्राला ज्याची उत्सुकता लागली आहे की त्या शिवसेना, भाजपा आणि मित्रपक्षांची महायुती होणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र याबाबत अधिकृत घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे करतील, असे ते म्हणाले.
जागावाटपाचं देखील ठरलं आहे. सहमती पूर्ण झाली आहे. सहमती हा फॉर्म्युला आहे, असेही ते म्हणाले. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज रात्री कधीही येऊ शकते. जागावाटपात काहींवर अन्याय होईल अशी शक्यता आहे. मात्र ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना भविष्यात न्याय दिला जाईल, असेही ते म्हणाले. आमची अधिकृत यादी दिल्लीहून प्रकशित होते, यादी आल्यानंतर प्रत्येक उमेदवारांना घरी जाऊन एबी फॉर्म दिले जातील, असेही पाटील म्हणाले.