बीड : पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शेकडो भाजप कार्यकर्ते परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यानंतर जुगल किशोर लोहिया यांच्या तक्रारीवरुन धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर पंकजा समर्थकांनी  'धनंजय मुंडे मुर्दाबाद' अशा घोषणा देत निषेध केला.

परळी मतदार संघातील लढत लक्षवेधी झाली असून आरोप प्रत्यारोप झाल्याने निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांना भोवळ येऊन त्या खाली पडल्या. यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून धनंजय मुंडे यांनी जे भाषण केले त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. 'धनंजय मुंडे मुर्दाबाद' अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी थेट परळी पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल करत अटकेची मागणी करीत घोषणाबाजी केली होती. जोवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर पंकजा मुंडे समर्थक पोलीस स्थानकातच ठाण मांडून बसले होते. अखेर जुगल किशोर लोहिया यांच्या तक्रारीवरुन परळी शहर पोलीस ठाण्यात अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे 509, 294, 500 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकजा मुंडे सभेदरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळल्या

शिरुरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंचा पुतळा दहन करून वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तर सुरेश धस मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी  कुसळंब येथे धनंजय मुंडेंचा पुतळा दहन करुन निषेध केला. धनंजय मुंडे यांनी खालच्या भाषेत टीका केल्याच्या धक्का सहन न झाल्याने पंकजा मुंडे यांना भोवळ आली असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या बहिणीबद्दल जे नीच वक्तव्य केले आहे त्याचा निषेध व्यक्त करीत धनंजय मुंडे यांच्या या कारनाम्याबद्दल शरद पवार,अजित पवार यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.  ज्या बहिणीने 29 वर्ष राखी बांधली त्या बहिणीबद्दल अस बोलताना यांना लाज कशी वाटली नाही, असेही सुरेश धस म्हणाले.

दरम्यान आज, महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये आज त्यांची शेवटची सभा घेतली.  या सभेत भाषण केल्यानंतर स्टेजवरच त्यांना चक्कर आली. चक्कर आल्यामुळे त्या स्टेजवरच कोसळल्या. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला होता.  गेल्या आठ दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्या राज्यभर सभा सुरु आहेत. त्यामुळे त्यांची मोठी दगदग झाली. आज त्यांनी परळीत एक भावनिक भाषण केलं. परंतु भाषणानंतर त्या चक्कर येऊन स्टेजवर कोसळल्या. यावेळी त्यांचे पती अमित पालवे त्यांच्यासोबतच होते. चक्कर आल्यानंतर पालवे यांनी पंकजा यांना दवाखान्यात घेऊन गेले.