BJP Maharashtra Committee Meeting मुंबई: राज्याला सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या मुख्यमंत्रिपदाचा आज फैसला होईल. कोण होणार मुख्यमंत्री यांचं नाव आज जाहीर होईल. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची बैठक आहे. मात्र त्याआधी अगदी काही क्षणात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. कोअर कमिटी आणि विधी मंडळ पक्षाची बैठक (BJP Maharashtra Committee Meeting) आज विधानभवनात पार पडणार आहे. या बैठकीसाठी भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपचे नेते दाखल झाले आहेत. आज सकाळी 10 वाजता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आणि 11 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक होईल. विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन निरीक्षक म्हणून इथे आलेले आहेत. हे दोन्ही निरीक्षक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतील. महायुतीत एकी आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी ही भेट असेल असं बोललं जातंय.
भाजप विधमंडळ पक्ष कार्यालयात आतापर्यंत कोण-कोण आले?
देवेंद्र फडणवीस
पंकजा मुंडे
मनिषा चौधरी
प्रविण दरेकर
पराग अळवणी
चंद्रकांत पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
अशोक चव्हाण
गिरिश महाजन
अतुल सावे
शिवेंद्रराजे भोसले
राहुल नार्वेकर
चंद्रशेखर बावनकुळे
रविंद्र चव्हाण
सदाभाऊ खोत
गोपिचंद पडळकर
विनोद तावडे
मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज-
अखेर मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावर मोहोर उमटवतील. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक होणार आहे. विधान भवनाच्या प्रवेशद्वाराला फुलांची सजावट करण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशीच चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार-
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उद्या मुंबईमध्ये शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. या सोहळ्यात भगवा रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले असून. हजारो उपस्थितितांना बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच आझाद मैदानाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.