मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज पवारांच्या बालेकिल्ल्यात अर्थात बारामतीत धडकली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात जेवढी कामं झाली, त्यापेक्षा अधिक कामं युती सरकारनं केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
तर पवारांनी चूक केल्यानंच आज राष्ट्रवादीला मोठी गळती लागल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तिथून बाजूला केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण आटोपतं घेतलं.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सत्तर वर्षांमध्ये जे 370 कलम रद्द झालं नाही ते आत्ता रद्द झालं. नरेंद्र मोदी नावाचा वाघ त्यासाठी होता. गळती लागलीय कारणं बुरे काम का बुरा नतीजा बुरा होता है, असा टोला त्यांनी लगावला. आमच्या सरकारने सगळंच केले असं नाही, पण आम्ही पाच वर्षांत केलेली कामं बघा आणि यांनी केलेली 15 वर्षांतील कामं बघा. आमची कामे जास्त आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
यांच्याकडे प्रचंड गळती लागलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज ही भाजपसोबत आहेत, असेही ते म्हणाले. ज्यावेळी बारामतीकडे येण्यासाठी मी निघालो तेव्हा सांगण्यात आलं की आपल्या साऊंड सिस्टीमला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. येवढा धसका त्यांनी घेतलाय. पण आम्ही नरेंद्र मोदी यांचे बाशींदे आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.