Devendra fadnavis : महिलांवरील अत्याचार हा गंभीर आणि चिंताजनक विषय आहे. पण विरोधक याचे भांडवल करत बिनबुडाचे आरोप करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर सरकारची भूमिका स्पष्ट करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी महिला अत्याचार, महिला गायब, सायबर गुन्हेगारी यासाह प्रत्येक विरोधकांच्या मुद्द्याला आपल्या शैलीत उत्तर दिले. 



विधानसभेत चर्चेला उत्तर देताना फडणवीस काय म्हणाले... ?


चर्चेच्या माध्यमातून राज्याची परिस्थिती काय आहे? यावर चर्चा करता येते. सदस्यांमार्फत जे प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे वस्तुस्थितीची जाणीव होते. विरोधी पक्षाच्या प्रस्तावाचा सूर हा महिला अत्याचार वाढले आहेत, असा होता.  महिलांवरील अत्याचार हा गंभीर व चिंताजनक विषय आहे. महिला पुढे येत आहेत. अत्याचाराच्या विरोधात महिला सातत्याने तक्रार नोंदवत आहेत, ही समाधानाची बाब आहे. 


सामाजिक दबावाखाली असे अत्याचार दाबले तर ते कमी करता येणार नाहीत. केरळ, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांनंतर महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. पण गुन्ह्यांची तुलना ही प्रति लाख व्यक्तींमागे किती गुन्हे... हे प्रमाण लावायला हवे. तर महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे.


महिलांसंदर्भात तक्रार झाली की ती एफआयआरमध्ये रूपांतरित करण्याचा कायदा केला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर, तर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे.


महिला घरून निघून जाणे व अपहरणाचा मुद्दा सातत्याने मांडला जात आहे. विरोधकांनी याबाबत सातत्याने टीका केली. हे खरे आहे, देशात व महाराष्ट्रात महिला हरवण्याच्या किंवा पळवून नेण्याच्या घटना आढळतात. पॉस्को नुसार १७.२ टक्के क्राईम रेट महाराष्ट्रात आहे. लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र १७व्या क्रमांकावर आहे. दिल्ली, हरियाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, ओरिसा यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 


सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णायामुळे 72 तासांनंतरच मिसिंग रिपोर्ट करावा लागतो. त्यांचे अपहरण झाल्याचे समजून तपास करावा लागतो. अशाप्रकारे महिलांसंदर्भात अपहरण झाले किंवा निघून गेल्या त्याचे गुन्हे हे २०२१ साली ८६ टक्के उघडकीस आले आहेत. २०२३ साली ६३ टक्के उघडकीस आले आहेत. 


लॉकडाऊन काळात देखील मोठे गुन्हे घडलेले आहेत. एखादी स्त्री स्वतः जरी निघून गेली तरी मिसिंग अशी नोंद करावी लागते. सापडण्याचे प्रमाण 10 टक्क्यांनी जास्त आहे
बेपत्ता आणि अल्पवयीन बालकांचा विचार केला तर 96 टक्के परत आणली आहेत. बालकांच्या बाबत आपण ऑपरेशन मुस्कान चालवलं आहे. 35 ते 40 हजार मुलांना आपण पकडून घरापर्यंत पोहोचवले आहे. देशात देखील ऑपरेशन मुस्कानचे कौतुक केले गेले. अपहरण झालेल्या महिलांचा शोध घेण्यात आपण पुढे आहोत. गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई आपण केलीय. 


तडीपारची 1651 प्रकरणे आपण केली आहेत. मोक्का अंतर्गत 92 प्रकरणे आपण केलेली आहेत. अमली पदार्थाबाबत देखील आपण जॉईंट टास्क फोर्स केलेले आहे. मोठ्या प्रमाणात आपण अंमली पदार्थांच्या स्रोतापर्यत आपण पोहोचलो आहोत. सायबर गुन्ह्यात देखील वाढ झालेली आहे. स्ट्रीट क्राईमपेक्षा हळूहळू सायबर क्राईम वाढत आहे. सायबर क्राईममध्ये आपले राज्य पाचव्या स्थानावर आहे.  आपण 43 सायबर लॅब सुरू करत आहोत. देशातला सर्वात ऍडव्हान्स सायबर प्लॅटफॉर्म असेल.