नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीने विरोध केल्यानंतरही राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एवढच नव्हे तर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशिवाय इतर पर्यायाचा विचार व्हावा, या प्रस्तावावर देखील राहुल गांधी ठाम असल्याचं कळत आहे.


लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवावर चिंतन करण्यासाठी कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला. मात्र काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळून लावला.


नेत्यांच्या विरोधानंतरही राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची समोर येत आहे. राहुल गांधी आपला निर्णय मागे घेतील याची शक्यता फार कमी आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यापलीकडचा माणूस हवा. मी काँग्रेससाठी सैनिकासारखं काम करत राहीन, असं वक्तव्यही राहुल गांधींनी बैठकीत केल्याची माहिती समोर येत आहे.



राहुल गांधींच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास दाखवला असला तरी त्यांच्या ऑफिसच्या कार्यशैलीबाबत मात्र काहींनी नाराजी व्यक्त केली. निखिल अल्वा, के. राजू, संदीप सिंह यांच्यासारखे राहुल यांचे अनेक सहकारी हे डाव्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे पक्षाची दिशा चुकत असल्याचा अनेकांचा आरोप होता.


काँग्रेस वर्किंग कमिटीच्या या बैठकीत जे लोक चिंतनासाठी बसले होते, त्यापैकी अनेकांना पराभवाचा झटका बसला आहे. राहुल गांधी स्वतः अमेठीतून हरले आहेत. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेदेखील हरले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, आरपीएन सिंह, सुषमासिंह देव हे सर्व काँग्रेसचे बडे नेतेदेखील पराभूत झाले आहेत. त्यामुळे सीडब्लूसीत कोण कोणाकडे बोट दाखवणार हा प्रश्न होताच. आता या मंथनातून काँग्रेस पक्ष खरंच काही क्रांतिकारी बदल करणार का? की पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच पाहायला मिळणार, हे लवकरच कळेल.


VIDEO | राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेसचे कार्यकारिणीने फेटाळला | ABP Majha