नवी दिल्ली : काँग्रेसने हरियाणामध्ये आम आदमी पार्टीसोबत (आप) आघाडी करण्यास नकार दिला आहे. त्याअगोदर काँग्रेसने पंजाब आणि गोव्यातही आपसोबत आघाडी करण्यास नकार दिला होता. आता आप आणि काँग्रेसच्या दिल्लीतल्या आघाडीबाबत चर्चा सुरु आहेत. या आघाडीबाबत माहिती देण्यासाठी आज (शनिवार, 20 एप्रिल) आपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया म्हणाले की, "दिल्लीत जर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तर, त्याला पूर्णपणे काँग्रेस जबाबदार असेल."

सिसोदिया म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या जोडीचा पराभव करणे, हे आमचे लक्ष्य आहे. परंतु जर ही जोडी पुन्हा सत्तेत आली तर, त्याला काँग्रेस जबाबदार असेल. कारण, कांग्रेसने काल हरियाणामधील आप आणि काँग्रेसच्या आघाडीबाबत नकार देत विषय संपुष्टात आणला. आम्ही दिल्ली, पंजाब, गोवा, हरियाणा मिळून 33 लोकसभा मतदार संघांचा प्लॅन केला होता. परंतु काँग्रेसने दिल्ली सोडून इतर कोणत्याही ठिकाणी आघाडी करण्यास साफ नकार दिला आहे."

सिसोदिया म्हणाले की, "दिल्लीत काँग्रेसचा एकही आमदार किंवा खासदार नाही. तरिही त्यांना दिल्लीत तीन जागा हव्या आहेत. हरियाणामध्येदेखील काँग्रेसचे सर्व नेते म्हणतात की, ते हरणार आहेत. त्यामुळे हरियाणात (जननायक जनता पार्टी) जेजेपी आणि काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी आम्ही आग्रही होतो. परंतु काँग्रेसने त्यास नकार दिला आहे."