मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. धुळे आणि मुंबईत एकाच दिवशी सभा घेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला.


भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या स्थितीत काँग्रेसने मोदी सरकारवर टीका करणं टाळलं, पण मोदी मात्र सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. मोदी पाच मिनिटंही आपला पीआर करणं सोडत नसल्याची टीका राहुल यांनी धुळ्यात केली. तर मुंबईत बोलताना मोदींना दहा मिनिटं पत्रकारांना सामोरं जाण्याचं आव्हान राहुल गांधींनी दिलं.

देशात काँग्रेसचं सरकार आलं तर दहा दिवसांत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु, मुंबईत एसआरए अंतर्गत 500 चौरस फुटाचं घर देण्याचं आश्वासनही राहुल गांधींनी दिलं.

काँग्रेसच्या महाआघाडीची दारं मनसेसाठी उघडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. 'हे महागठबंधन आहे, आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत' असं राहुल गांधी म्हणाले.

मुंबईतील सभेचे महत्त्वाचे मुद्दे

- मुंबई हे साधंसुधं शहर नसून देशाचं इंजिन आहे
- बजेटमध्ये पियुष गोयल यांनी काही घोषणा केल्यानंतर पाच मिनिटं सलग धडधड टाळल्या वाजल्या, मी विचारलं बाबा काय झालं, तर नंतर समजलं देशाच्या शेतकऱ्याला दिवसाचे 17 रुपये दिले आणि एका व्यक्तीला साडे तीन रुपये दिले
- मेहुल चोक्सीला 35 हजार कोटी दिले, तेव्हा यांनी टाळ्या का नाही वाजवल्या?
- खोटं ऐकायचं असेल तर चौकीदारच्या सभेला जा... खरं ऐकायचं असेल तर इथे या
- 'मन की बात' सुननी है, वहा जाओ और 'काम की बात' सुननी है तो यहा आओ
- मुंबईतल्या व्यापाऱ्यांना विचारतो त्यांचे साडे तीन लाख कोटी माफ केले तुमचे किती केले?
- या शहरात लाखो युवकांनी एज्युकेशनल बँक लोन घेतलं आहे. 15 उद्योजकांचं कर्ज माफ झालं, पण या युवकांची, शेतकऱ्यांची आणि छोट्या व्यापारांची काय चूक आहे की त्यांचं कर्ज माफ होत नाही.
- आपला पैसा विम्यासाठी अनिल अंबानींच्या कंपनीला द्या आणि नैसर्गिक आपत्ती आल्यावर काहीच मिळणार नाही
- तुम्हाला मित्रो बोलणार आणि त्यांना मेहुल भाई म्हणून हाक मारणार
- नोटाबंदीनंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, अनिल अंबानी, विजय मल्ल्या लाईनीत उभे होते का? नाही.. कारण ते प्रायव्हेट जेटमधून उडाले होते
- चौकीदारने 15 वर्ष गुजरातवर राज्य केलं. शिवराज चौहानने 15 वर्ष राज्य केलं, पण आम्ही दहा दिवसात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु
- एसआरए तुम्हाला 250 चौरस फुटांचं घर देते, काँग्रेस सरकार तुम्हाला 500 चौरस फुटांचं घर देईल, काँग्रेस जे बोलते ते करुन दाखवते
- मोदींना कधी मीडियासमोर जाताना पाहिलं का? माझ्या प्रेसच्या मित्रांना फक्त दहा मिनिटं द्यावी त्यांनी, सगळं दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल.
- मला आणि मोदींना आमच्या मीडियासमोर डिबेटला बसवा, देश सोडून पळायची वेळ नाही आली त्यांच्यावर तर विचारा
- मला मेड इन चायना नाही, मला मेड इन धारावी, मेड इन मुंबई, मेड इन महाराष्ट्र बघायचंय
- माझा कार्यकर्ता बब्बर शेर आहे
- पुन्हा एकदा विंग कमांडर अभिनंदन यांचं भारतात स्वागत करतो

राहुल गांधींच्या सभेतल्या काही इंटरेस्टिंग घडामोडी

मुंबई काँग्रेसच्या जाहीर सभेत मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यानंतर माजी खासदार मिलिंद देवरा यांना भाषणाचा आग्रह करण्यात आला. एकेमेकांमधले हेवेदावे दूर करण्यासाठी दोघांना एकापाठोपाठ एक बोलायला लावून वादावर पडदा टाकण्याचे सूचक संकेत राहुल गांधी यांनी सभा मंचावरुन दिले. विशेष म्हणजे संधीचा फायदा उचलत मिलिंद देवरा यांनी हिंदीसोबत मराठीतही भाषण करुन टाळल्या मिळवल्या.

राहुल गांधी यांनी संजय निरुपम भाषणाला उठताच माजी खासदार प्रिया दत्त आणि एकनाथ गायकवाड यांना बाजूला बोलावून बसवलं आणि लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पसंती जणू मंचावर सूचित केली. इतकंच नाही तर एकनाथ गायकवाड यांचा दावा असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून इच्छुक असलेल्या भालचंद्र मुणगेकरांनाही बोलावून चर्चा केली. या सगळ्यात अस्वस्थ दिसत असलेले कृपाशंकर सिंह मात्र स्वतःच जाऊन राहुल गांधींच्या बाजूला बसले, मात्र काही वेळातच त्यांना तिथून उठावं लागलं.