निवडणूक आयोग सध्या काँग्रेस आणि भाजपला दोन वेगळे नियम लावत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसकडून नरेंद्र मोदींविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्याबाबत राहुल गांधींनी 'एबीपी'शी बोलताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या तक्रारींवर मोदींनी क्लीनचिट देण्यात आली आहे. त्याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "सध्या दोन वेगळे नियम सुरु आहेत. भाजपसाठी एक तर दुसऱ्यांसाठी वेगळा. एखादी गोष्ट तुम्ही बोलले आणि तिच गोष्ट नरेंद्र मोदी बोलले तर त्याबद्दल तुम्हाला ऐकवलं जाईल आणि नरेंद्र मोदींना सोडून देण्यात येईल. सगळ्या देशाला हे दिसत आहे. हा दबाव आहे, भिती आहे त्यामुळे असं घडतंय."



सात टप्प्यांत होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या या कार्यक्रमावरुनदेखील राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. नरेंद्र मोदींनी फायदा होईल अशा प्रकारे निवडणुकीचे टप्पे ठरवण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाकडून अहमदाबादमधील रोड शो आणि चित्रदुर्ग मधील भाषण प्रकरणीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीनचिट देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण आठ प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाने मोदींना क्लीनचिट दिली आहे.