बंगळुरु : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेल कराराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राफेल करारातील पंतप्रधान कार्यालय आणि फ्रान्स सरकार यांच्यातील चर्चेच्या कागदपत्रांची तपासणी केली तर नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी दोघेही जेलमध्ये जातील, असा दावा राहुल गांधींनी केला आहे.


राहुल गांधी सातत्याने राफेल कराराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत आहेत. जर राफेलच्या कागदपत्रांची चौकशी झाली तर सत्य समोर नक्कीच समोर येईल. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी दोघेही जेलमध्ये जातील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. राहुल गांधी कर्नाटकमधील प्रचारसभेत बोलत होते.


जर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोषी नसतील, तर त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले पाहिजेत. त्यामुळे जे लोक यासाठी जबाबदार असतील ते जेलमध्ये जातील. मात्र नरेंद्र मोदी तसं काहीही करत नाहीत, असा आरोप राहुल गांधींनी केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पकडले गेले आहेत, त्यामुळे त्यांनी आता सगळ्यांना चौकीदार बनवलं आहे. देशाच्या रक्षणासाठी लोकांनी मला चौकीदार बनवावं असं मोदींनी म्हटलं होतं. मात्र आता ते संपूर्ण देशाला चौकीदार बना असं सांगत आहेत, असा पलटवार राहुल गांधींनी मोदींवर केला.


काय आहे प्रकरण? 


राहुल गांधी दावा करत आहेत की, राफेल विमान फ्रान्सची कंपनी दसॉल्टकडून 526 कोटींना खरेदी केलं जाणार होतं. याबाबत यूपीए सरकारच्या काळात फ्रान्स सरकारसोबत बोलणी झाली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स सरकारसोबत चर्चा करुन राफेल विमान 526 कोटींऐवजी 1600 कोटींना खरेदी करण्याचा करार केला.


VIDEO | देशभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा