औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील नाराजीनाट्य काही  थांबण्याचं नाव घेत नाही. अब्दुल सत्तार यांच्या बंडाळीनंतर औरंगाबाद येथील काँग्रेस कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी ही माहिती दिली आहे.


VIDEO | अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांना भेटले, काँग्रेसवर दबाव की खरोखर भाजपच्या वाटेवर? | एबीपी माझा



येत्या दोन दिवसात काँग्रेसने औरंगाबादेतील उमेदवारी बदलावी अन्यथा आम्ही राजीनामे देऊ ,असा इशारा त्यांनी पक्षाला दिला  आहे. काँग्रेसने औरंगाबादमध्ये निवडून येणारा खासदार घ्यायला हवा होता ,पण तसं काही झालं नाही आणि त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचलत असल्याची प्रतिक्रिया देखील रामकृष्ण बाबा पाटील यांनी दिली आहे.

अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढवणार, मध्यरात्री घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दरम्यान त्याआधीच लोकसभेच्या तिकीटावरुन नाराज असलेल्या काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री 1.30 च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. तसेच आपण औरंगाबाद लोकसभेमधून अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे सांगितले.

रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना सत्तार म्हणाले की, मी विरोधी पक्षाचा आमदार असूनही गेल्या साडेचार वर्षांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी मदत केली आहे. म्हणूनच काल रात्री मी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच यावेळी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मी औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहे.

भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या इन्कमिंगमध्ये अब्दुल सत्तारांचे नाव सहभागी होणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत सत्तार म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षात जाणार नाही. मी काल केवळ मुख्यमंत्र्यांची सदिच्छ भेट घेतली होती.

दरम्यान, औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरुन काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यामुळे काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले आहे. सुभाष झांबड यांना पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याचे सत्तार त्यांनी म्हटले आहे.

सत्तार यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. याबाबत ते म्हणाले की, यापूर्वीच मी माझा राजीनामा दिला आहे. तीस वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर पक्ष लोकसभेचे तिकीट देईल, असे मला वाटत होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

VIDEO | अशोक चव्हाणांना हायकमांड जुमानत नाही का? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा