Himachal Election 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा (Himachal Election News) निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अशातच सर्वच पक्षांनी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 68 पैकी 67 विधानसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  पण याच तिकीट वाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असल्याचं दिसत आहे. 


हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी (Himachal Election) रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसनं आपल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या मुला-मुलींना तिकिटं देण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याला तिकीट न दिल्यानं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.


प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंह सुखू हे प्रामुख्यानं युवक काँग्रेसच्या नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यदुपती ठाकूर यांचा एक ऑडिओ व्हायरल होत असून, त्यात त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर येत आहे.


तीन मोठ्या चेहऱ्यांना तिकीट मिळालं नाही


प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष निगम भंडारी, प्रदेश कार्याध्यक्ष यदुपती ठाकूर आणि प्रदेश सरचिटणीस सुरजित भरमौरी यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये राजकारण्यांच्या पुढच्या पिढीला तिकीट वाटपात प्राधान्य देण्यात आलं आहे. दिवंगत वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांच्या पुत्रांना तिकीट मिळालं आहे. त्याचबरोबर 'एक कुटुंब एक तिकीट' या नियमाला बगल देत बाप-लेकी दोघांनाही निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं आहे. काँग्रेसचा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता, जो काही तासांपूर्वीच पक्षात दाखल झाला होता.  


सकाळी पक्षप्रवेश, संध्याकाळी निवडणुकीचं तिकीट 


शिमला ग्रामीणचे प्रदेळ अध्यक्ष प्रतिभा सिंह आणि माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना तिकीट देण्यात आलं आहे. सध्या ते आमदार आहेत. 
वीरभद्र सिंह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले राजकृष्ण गौर यांचे पुत्र भुवनेश्वर गौर यांना मनालीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
सिमलाचे खासदार केडी सुलतानपुरी यांचे पुत्र विनोद सुलतानपुरी यांना कसौलीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
वीरभद्र सिंह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले सत महाजन यांचे पुत्र अजय महाजन यांना काँग्रेसनं नूरपूरमधून संधी दिली आहे.
वीरभद्र सिंह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले जीएस बाली यांचे पुत्र आरएस बाली यांना नगरोटामधून तिकीट देण्यात आलं आहे.
वीरभद्र सिंह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले कौल सिंह ठाकूर यांना तिकीट देण्याबरोबरच त्यांच्या कन्या चंपा ठाकूर यांनाही काँग्रेसनं मंडीतून उमेदवारी दिली आहे.
चैतन्य शर्मा यांनी सकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि संध्याकाळी गाग्रेट येथून त्यांना तिकीट मिळालं. त्यांचे वडील निवृत्त आयएएस आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राउंड सर्व्हेमध्ये विजयाच्या दाट शक्यता असल्याचं समोर आलं आहे. याच माहितीच्या आधारावर काँग्रेसनं तिकीट वाटप केलं आहे.