नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजणार आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागा लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक दौऱ्यावर असताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून आता युतीच्या जागावाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.


येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. यामध्ये काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे. तसेच यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप, जोगेंद्र कवाडे, राजू शेट्टी, आणि इतर डावे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फॉर्म्युला ठरला असताना युतीच्या जागावाटपाबाबत मात्र अजुनही चर्चाच सुरु आहे. दोन्ही पक्षांनी किती जागा लढवायच्या आणि मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या यावरुन युतीमध्ये आणखी मतभेद आहेत. भारतीय जनता पक्ष शिवसेनेला 120 जागा देण्यास तयार आहे मात्र शिवसेनेनं 135 जागांची मागणी लावून धरली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच युतीतील मित्रपक्षांना नेमक्या किती जागा देण्यात येणार, याबद्दलही चर्चा आहे. युतीतील मित्रपक्षांनी भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही बोललं जात आहे.